शरद पवारांना धमकी ; राज्य सरकारकडून गंभीर दखल, कारवाईचे आदेश

Santosh Gaikwad June 09, 2023 04:44 PM


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी सोशल मिडीयावरूनर  देण्यात आली. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांना चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत असे सांगितले आहे की, 'ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे. त्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.'


 गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत. त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसंच, औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल. असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  


दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'शरद पवार  यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरुन धमकी आली, त्याची शहानिशा करुन कारवाई करा.' या धमकी प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना ट्विटर अकाऊंटची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.