गुड न्यूज : मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

Santosh Gaikwad July 20, 2023 08:58 PM

मुंबई : मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला 'तुळशी' हा पहिला तलाव ठरला आहे.  या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. 


८०४ कोटी लीटर इतकी कमाल उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२ व सन २०२१ मध्ये १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. तर वर्ष २०२० मध्ये २७ जुलै; वर्ष २०१९ मध्ये दिनांक १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक ९ जुलै रोजी; वर्ष २०१७ मध्‍ये दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर (५,७३,३४० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ३९.६१ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. ..


 तलावनिहाय आकडेवारी ..


*अप्पर वैतरणा तलावात ३,३६०.५० कोटी लीटर (३३ लाख ६०५ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा  

*मोडक-सागर तलावात ८,१२१.४ कोटी लीटर (८१ हजार २१४ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा  

*तानसा तलावात १०३०३.१ कोटी लीटर (१,०३,०३१ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा 

*‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (मध्य वैतरणा) ९८०९.५ कोटी लीटर (९८ हजार ९५ दशलक्ष लीटर) पाणीसाठा 

*भातसा तलावात २३,१९२ कोटी लीटर (२,३१,९२० दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा  

*विहार तलावात १७४२.७ कोटी लीटर (१७ हजार ७२७ दशलक्ष लीटर) पाणीसाठा आहे. 

*तुळशी तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

 ===