ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात, ५० जणांचा मृत्यू, १७९ जण गंभीर जखमी

Santosh Sakpal June 02, 2023 10:03 PM

ओडिशा : ओडिशात मोठी रेल्वेची दुर्घटना घडली आहे. बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये मोठा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत. या घटनेत १७९ प्रवाशी जखमी झाले असून ५० हून अधिक जणांचा मृत्यू भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा येथील शालिमार स्टेशनवरून चेन्नईला येत असे. आज ( २ जून ) ओडिशातील बहनागा स्टेशनजवळ आल्यावर कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडी समोरा-समोर आली. या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून खाली घसरले. ही माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत.

स्थानिकांच्या मदतीने पथकांकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेरूळ रिकामा करण्याचं काम सुरु आहे. १५ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीचएसी, खांतपाडा पीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

अपघाताचं कारण काय?

एकाच रूळावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी समोर आल्याने हा अपघात झाला आहे. सिग्नलच्या तांत्रिक कारणामुळे मालगाडी आणि एक्स्प्रेस एकाच रुळावर आल्याचं सांगितलं जात आहे.