मनोहर जोशीच्या निधनानाने राजकीय वर्तुळात हळहळ : मान्यवरांकडून श्रद्धांजली
Santosh Gaikwad
February 23, 2024 11:11 AM
मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकारा च्या झटक्याने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत माटुंगा येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून, राज्यपाल मुख्यमंत्र्यांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रिन्सिपल मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्त्व होते : राज्यपाल
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
कुशल संघटक, उत्कृष्ट संसद पटू, अभ्यासू विरोधी पक्षनेते, उत्कृष्ट लोकसभा अध्यक्ष असा सार्थ लौकिक असलेल्या मनोहर जोशी यांनी प्रत्येक पदावर काम करताना आपला वेगळा असा ठसा उमटवला. कौशल्य शिक्षणाचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्यांनी कोहिनूर संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण तरुणींना तंत्र व कौशल्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली. उत्कृष्ट वक्ते, मितभाषी, शिस्तप्रिय व राजकारणातील अजातशत्रू असे ते व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका तत्त्वनिष्ठ नेत्याला आपण गमावले आहे. जोशी हे लोकसभा अध्यक्ष असताना आपला त्यांच्याशी घनिष्ठ परिचय झाला व तो कायम राहिला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिक्षणातील 'सर' ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, ' नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे ते सच्चे पाईक होते. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. राजकीय तसेच संसदीय लोकशाही प्रणालीवर गाढा विश्वास असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते. जिथे जिथे त्यांनी काम केले. तिथे तिथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. 'स्वच्छ मुंबई -हरित मुंबई' हा त्यांचा ध्यास होता. त्यावर त्यांनी पुस्तकही लिहिले. त्यांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय विरोधीपक्ष नेता संघाची स्थापना केली होती. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या स्थापनेत ते पुढे होते. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी याकरिता त्यांनी ॲडव्हान्टेज महाराष्ट्र, शेतीतील गुंतवणूकीसाठी ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र अशा संकल्पनांना मुर्त रुप दिले. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा एक्स्प्रेस - वे म्हणता येईल असा मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग त्यांच्याच काळात साकारला गेला. सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवातही त्यांच्याच काळात झाली. टॅकरमुक्त महाराष्ट्र ही देखील त्यांचीच घोषणा. महाराष्ट्र भूषण या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपुर्ण राहिली. तिथेही ते कडक शिस्तीचे 'स्पीकर सर' आणि सर्वपक्षीयांसाठी आदरणीय होते. परखड विचारांचे आणि वाणीचे म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षासाठी देखील ही मोठी हानी आहे. आमचे सर्वांचे लाडके आणि मार्गदर्शक सर आपल्यात नाहीत ही कल्पना देखील करवत नाही. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला : नितीन गडकरी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
बाळासाहेबांचं स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण :राज ठाकरे
बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील मनोहर जोशी ज्येष्ठ नेते होते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत मनोहर जोशी सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता हरपला : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे . माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता.
नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले.
विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला : अजित पवार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अनेक मराठी तरुणांना उद्योगक्षेत्रातील संधींसाठी प्रशिक्षित केले. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी : संजय राऊत
मनोज जोशी यांच्या निधनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शोक व्यक्त केला आहे. "शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!", असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
महाराष्ट्राचा कोहिनुर हरपला : अंबादास दानवे
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील मनोहर जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "दुःखद! महाराष्ट्राचा 'कोहिनूर' आज पहाटे हरपला. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांचे पहाटे निधन झाले.शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे व अनमोल आहे."
बाळासाहेबांचा एक कडवट शिवसैनिक : छगन भुजबळ
सर्वसामान्य परिस्थितीतून कष्टाने पुढे येत त्यांनी राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले आणि देशाच्या राजकारणातही नावलौकिक मिळविला. प्रचंड गरिबीतून त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे. त्यांच्या निधनाने बाळासाहेबांचा एक कडवट शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो आणि मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले : शरद पवार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भुमिका होती. मी जोशी कुटूंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
एक सुसंस्कृत, अनुभवी नेता गमावला : चंद्रशेखर बावनकुळे
मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सुसंस्कृत, अनुभवी नेता गमावला आहे. जोशी सरांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.