मुंबईतील पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करणार – मंत्री उदय सामंत
Santosh Gaikwad
March 24, 2023 12:00 AM
मुंबई, दि. २४ : मुंबई शहराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी पाणी गळती रोखण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. आतापर्यंत ३ वर्षात ९ हजार २८४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, तर ९६ हजार ४७० ठिकाणची पाणी गळती दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य राजहंस सिंह यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की, मुंबई शहराला सध्या तानसा, मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा धरणातून पाणीपुरवठा होतो. याशिवाय, गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा या तीन प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या काळात शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या तीनही प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेत विलास पोतनीस, महादेव जानकर, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.