मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज दिलेला निर्णय हा सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडनागडं राजकारण उघड पाडणारा आहे, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत मला समाधान वाटते. हा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याच्या नव्हता, तर लोकशाही जिवंत ठेवण्याच्यादृष्टीने आवश्यक होता. या निकालामुळे राज्यपालांचं वस्त्रहरण झाले आहे. आजपर्यंत राज्यपाल पद हे आदराचं होतं, पण भाजपने या यंत्रणेचे धिंडवडे काढले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यपाल पद हे अस्तित्त्वात असावे की नाही, याचाही विचार आपण केला पाहिजे. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नव्हता असेही ठाकरे म्हणाले
व्हीप शिवसेनेचाच
सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. पण पक्षादेश (व्हिप) हा माझ्याच शिवसेनेचा असेल. त्यामुळे आता आम्ही लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांकडे तशी मागणी करु, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.