अमरावती: शिवसेनेतील फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर आज त्यांनी अमरावतीत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपचा उल्लेख नामर्द, घरफोडे आणि घरचेभेदी असा उल्लेख केला. तसेच भाजपला सत्तेची मस्ती आल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी घरी बसून होतो. मान्य आहे. पण मी कुणाची घरं फोडली नाही. घर फोडे तुम्ही आहात. मी घरी बसून जी कामं केली, ती तुम्हाला घरं फोडून करता आली नाही. तुम्हाला दारं उरली नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही. त्यामुळेच शासन आपल्या दारी सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यक्रमात गर्दीसाठी बसवलं जात आहे. ही वेळ का आली तुमच्यावर? काम केली असती तर असे कार्यक्रम घेण्याची वेळ तुम्हाला वेळ आली नसती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.