बंडखोरांचा मालिक एकच : उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल !

Santosh Gaikwad July 09, 2023 07:29 PM


यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सर्व पक्षातील बंडखोरांचा एकच मालिक आहे. मत कुणालाही द्या, सरकार माझचं येणार, अशी भाजपची निती आहे. आता राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.   पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र चार दिवसातच राष्ट्रवादी फुटली आणि बंडखोर भाजपसोबत गेले. मोदी म्हणाले राष्ट्रवादी भ्रष्ट आता त्याच नेत्यांसोबत मोदींचा फोटो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


माझ्यावर आरोप करतात घरी बसलो होतो. मात्र घरी बसून महाराष्ट्र चालवला. माझं नेतृत्व हे तुम्ही ठरवणार नाही, जनता ठरवेल. मी काँग्रेससोबत, पण तुम्ही मला तिथे ढकलले. तुम्ही मुफ्ती मेहबुबा सोबत गेले, मग मी काँग्रेससोबत गेलो तर काय झाले? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.


राज्यात एक फुल्ल दोन हाफ सरकार 

सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक फुल्ल दोन हाफ अशी स्थिती आहे. आमचे सरकार होते तर ते तीन चाकाचे सरकार होते. यांचे सरकार लगेच आता त्रिशूळ सरकार झालं असल्याचं सांगतात. हे बेगडी सरकार चिरडून टाकण्यासाठी मी आलो आहे. तुम्ही लढणार असाल तर मी पुढे चालणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


संजय राठोडांवर टीका ...

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्री संजय राठोडांवरही निशाणा साधला. 200 रुपये हफ्ता घेणाऱ्याला मंत्री कुणी केलं. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत, असा टोला उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना लगावला. तसेच भाजप आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. अनेक नेत्यांना मोठ्या कष्टाने भाजप वाढवला. मात्र आता निष्ठावंताची काय हालत होत आहे. भ्रष्टाचाराने माखलेल्या लोकांच्या सतरंज्या आता भाजपमधील निष्ठावंत अंधभक्त उचलत आहेत. 


पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो....

माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन मी जाहीरपणे आधीच सांगितलं आहे. अमित शाह आणि माझ्यात बंद दाराआड काय घडलं ते सांगितलं आहे. आज मी पोहरादेवीला आलोय. इथेही मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो आमच्यात अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं ठरलं होतं. ते वचन शाह यांनी पाळलं असतं तर आज कदाचित भाजप किंवा शिवसेनाच मुख्यमंत्री होऊन गेला असता. आज भाजपला इतर पक्षातून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या असे उध्दव ठाकरे म्हणाले.