घटनाबाह्य मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे : उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
Santosh Gaikwad
August 22, 2024 11:05 PM
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलापूर लैंगिक अत्याचाराची घटना मान्य आहे का? त्यांना जर यात राजकारण दिसत असेल, तर हे घटनाबाह्य मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे आहेत आणि नराधमांचे पाठीराखे आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुबईत पत्रकार परिषदेत केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र हा राजकीय बंद नाही. करोना काळात जसा महाराष्ट्र एक कुटुंब बनून लढला, तशी वेळ आली आहे. ही विकृतीचा निषेध नाही तर बंदोबस्त करण्याची वेळ आहे. कारण प्रत्येकाच्या मनात हीच खंत आहे. जर शाळेतही मुली सुरक्षित नाहीत, तर मुलगी शिकली प्रगती झाली याला अर्थ काय आहे. महाराष्ट्राने व्यक्त व्हायला हवं. राजकारण म्हणून नाही तर माता भगिनी सुरक्षित राहाव्यात ही प्रत्येक पक्षाची भावना असायला हवी. मुंबईसह राज्याच्या कानकोपऱ्यातून लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील घटनेच्या विरोधात देशभरात आगडोंब उसळला आहे. मागे निर्भया प्रकरणीही संपूर्ण देश एकवटला होता. जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो, तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. महाराष्ट्र बंदमध्ये राजकीय अभिनिवेश नाही. करोनासारखा विकृतीचा व्हायरस आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नराधमांना अशी शिक्षा व्हायला हवी, की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावता कामा नये. तसं केल्या कठोर शिक्षा होते ही भीती निर्माण करण्यासाठी हा बंद आहे. मुली सुरक्षित असतील तर लाडकी बहीण योजना आणण्यात अर्थ आहे. मुलगी ही मुलगी असते. राजकीय पक्ष, जात पात धर्म मध्ये यायला नको. मुली शाळेतच सुरक्षित नसेल तर शिक्षणाला अर्थ काय? उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आयेंगे, ही जुनी कविता पुन्हा व्हायरल होतेय. पण या प्रकरणात लहान मुलींना कसं कळणार की शस्त्र उचला, त्यांना शिकायला पाठवतोय. कडेवरच्या मुलांवर अत्याचार होत आहे, अशा मुली घाबरुन गप्प बसतात, त्यांच्यावर आघात होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.