टोपी घालणारा अर्थसंकल्प : उध्दव ठाकरेंची टीका
Santosh Gaikwad
February 01, 2024 06:56 PM
मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ठाकरे म्हणाले की, मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असून यात जादूचे प्रयोग दाखवले आहेत. एकप्रकारे टोपी घालणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे.
ठाकरे म्हणाले की केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गरीब, महिला, तरुण, शेतकरी, जातीसाठी काम करणार, असे म्हटले. याबाबत त्यांचे अभिनंदन करायला हवे. १० वर्षानंतर मित्रा पलीकडे देश असल्याची त्यांना जाणीव झाली, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला. महिलांबाबत जाहीर केलेल्या योजनांचा ही ठाकरेंनी समाचार घेतला. मनीपूर, बिल्कीस बानो महिला नाहीत का, त्यांना धीर देण्यासाठी जा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
तसेच केंद्रीय मंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सगळे जादूचे प्रयोग आहेत. मुळात हा अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. महिलांना मोफत सिलेंडर देण्याची घोषणा देखील होईल. परंतु, दहा वर्षापूर्वी युवकांना नोकऱ्या देणार होते, त्याचे काय झाले, असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दहा वर्षात सरकारने काहीच केलेले नाही. त्यामुळे निवडणुका आल्याने मतांसाठी खोटी आश्वासने दिली जात आहेत. पंतप्रधानांच्या भाषेतील विकास म्हणजे तुम्हाला चिरडणे, अशा शब्दांत ठाकरेंनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले.
एकेकाळी केंद्र सरकार शेतकऱ्यांना अतिरेकी समजत होते. निवडणुका आल्याने आता शेतकऱ्यांचा त्यांना कळवळा आला आहे. महाराष्ट्रात दोन चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती आली होती. पंतप्रधान त्यावेळी महाराष्ट्र सोडून सगळे राज्य फिरले. महाराष्ट्रात येथे शेतकरी नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारने त्यावेळी निकष बाहेर शेतकऱ्यांना मदत केली. मात्र, आता निवडणुका आल्याने पंतप्रधान महाराष्ट्रात वाऱ्या करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.