मुंबई, दि. १०ः आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रीतपणे लढणार आहे. त्यामुळे २८८ मतदार संघात संघटनात्मक बांधणी करून ताकदीने कामाला लागा, अशा सूचना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख, पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. सोमवारी विधानसभेची रणनिती ठरवण्यासाठी दादर येथील शिवसेना भवनात ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकालावर मंथन आणि येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेण्यात आला. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अनिल परब आदी राज्यभरातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने तब्बल ३१ जागा जिंकल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. राज्यात मागील वेळी २३ जागा जिंकणा-या भाजपला अवघ्या ९ जागा मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपचे पानीपत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव करण्यात महाविकास आघाडीला यश आल्याने आता महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्याअनुषंगाने बैठक घेत कार्यकत्यांना संबोधित केले.
उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. यावेळी बैठकीत संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने आणि विधानसभेच्या दृष्टीने पूर्वतयारीवर भर देण्यात आला. त्यानुसार २८८ मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकीबाबत रणनिती आखण्यात आली. आता पावसाळा सुरू झाल्याने जाहीर सभांऐवजी राज्यभरात इनडोअर मेळावा किंवा बैठका घेतल्या जातील, असे राऊत यांनी सांगितले.
१८० ते १८५ जागा जिंकू : राऊत
महाविकास आघाडी सोबत शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या भागात पदाधिकाऱ्यांनी जोर लावावा. अधिक ताकदीने आणि मजबुतीने संघटनात्मक बांधणी करावी. आघाडीत वाट्याला येणाऱ्या जागा लढू या. लोकसभेत फटका बसलेल्या जागांवर पुन्हा मतांचा टक्का वाढवा. सर्वाधिक उमेदवार जिंकून या निवडणुकीत येतील, यासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करा, अशा सूचना ठाकरेंनी दिल्या आहेत. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीला १८० ते १८५ जागा जिंकू, असा निर्धार ही शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आल्याचे राऊत म्हणाले.