karnatak Result : देशातील एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीच्या पराभवाची सुरूवात : उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया

Santosh Gaikwad May 13, 2023 05:52 PM


मुंबई : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू असल्याने विरोधी पक्षांकडून भाजपवर टीकेचे सूर उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  “देशातील एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. सामान्य माणूसच हुकूमशहाचा पराभव करू शकतो, हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशाला दिला आहे. त्याबद्दल त्या शहाण्या जनतेचं अभिनंदन अशी ठाकरे म्हणाले आहेत. 


कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतील २२४ मतदारसंघांची मतमोजणी सुरू असून संध्याकाळ पाच वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला २० आणि अपक्षांना ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस बहुमताचा आकडा सहजपणे पार करेल, अशी स्थिती आहे. कर्नाटकात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोष केला जात आहे.


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली. कर्नाटकमध्ये काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाहांच्या बळजबरी सत्तेचं जोखड कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकून दिले. कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली आणि जिंकली. २०२४ सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधींचे खास अभिनंदन.