अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला उध्दव ठाकरेंचा पाठींबा

Santosh Gaikwad January 04, 2024 08:57 AM



मुंबई, दि. ३ः विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाखोंच्या संख्येने राज्यातील अंगणवाडी सेविका आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडले, अन्यथा आंदोलनाची वेळच येऊ दिली नसती. मात्र, सरकारने अंगणवाडी सेविकांच्या केसाला धक्का लावला तर याद राखावा, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले. आझाद मैदानात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला ठाकरेंनी पाठिंबा दिला. दरम्यान, सरकारवर सडकून टीका केली.
 

केंद्र सरकारने पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी लाडली बहिना योजनेची घोषणा केली. महाराष्ट्रात बहिणांना हक्कासाठी झगडावे लागत आहे. रस्त्यांवर बसण्याची वेळ आली आहे. या काही लाडली बहिणी नाहीत का, असा केंद्र सरकारला सवाल करत टीकेची झोड उठवली. सध्या धार्मिक वातावरण निर्मिती केली जात आहे. परंतु, कोविड काळात जातीपात न मानता तळागाळात सेवा देणाऱ्या सेविकांना सरकारने रस्त्यावर आणले, असा टोला ठाकरेंनी लगावला.

कोरोना संकट मग माझे आजारपण आले. त्यातून बरा होत असतानाच सरकार पाडले, अन्यथा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ दिली नसती, अशी ग्वाही ठाकरेंनी आंदोलनकर्त्यांना दिली.