मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटलेले दिसत आहेत. दोन्हीपैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलेले नाही. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
शरद पवार म्हणाले, “या निर्णयाचे मला आश्चर्य वाटले नाही. मी आमच्यात चर्चा करत असताना म्हणालो होतो की, उद्धव ठाकरेंना अनुकूल असा निर्णय लागणार नाही. सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी काय निकाल लागणार याबाबत आधीच भाष्य केलेले होते. त्यामुळे त्यांना आपणच जिंकू ही खात्री होती, तसे या नेत्यांनी ध्वनित केले होते. मी जो निकाल ऐकला त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. या निकालाच्या भाष्यावरून उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल अशी खात्री निकालावरून वाटते.”