आंध्रप्रदेश, बिहार लाडका आणि महाराष्ट्र परका का ? सुप्रिया सुळेंचा केंद्राला सवाल

Santosh Gaikwad July 23, 2024 06:32 PM


पुणे:  केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. आता याबाबत सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. सुळे म्हणाल्या हे एका विशिष्ट राज्याचं बजेट नसून देशाचं आहे सर्व राज्याला समान अधिकार मिळेल अशी अपेक्षा हेाती मात्र आंध्र प्रदेश आणि बिहारला अधिकार दिल्याचे दु:ख नाही, मात्र महाराष्ट्रावर अन्याय का ? आंध्रप्रदेश, बिहार लाडका आणि महाराष्ट्र परका का? असा प्रश्न यावेळी मला सरकारला विचारायचा आहे, असं सुळे म्हणाल्या आहेत.


 सुळे म्हणाल्या की, आंध्र प्रदेश आणि बिहारला जास्त दिल्याचे दु:ख नाही. पण हे देशाचं बजेट आहे. दो राज्यांचं नाही. स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी भाजपने असं केलं आहे. याआधीही २०१४ चंद्राबाबूंनी या गोष्टी मागितल्या होत्या. मात्र तेव्हा सरकारने दिल्या नाही. मात्र आता ३०० वरुन २४० वर आले तेव्हा भाजपला लहान राज्ये दिसायला लागली आहेत. जे आता आंध्र प्रदेश आणि बिहारला मिळालं आहे, याचं श्रेय जनतेला जातं. एनडीए सरकारमधील महाराष्ट्रातील खासदारांना मला विचारायचं आहे, मित्रपक्ष असून तुमच्या पदरात काहीच का पडलं नाही.