दिल्लीत विरोधकांची एकजूट : मोदींची मॅच फिक्सिंग, राहुल गांधींचा हल्लाबोल !
Santosh Gaikwad
April 01, 2024 10:46 AM
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 'मॅच फिक्सिंग' करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानातील सभेत केला आहे. पण संपूर्ण विरोधी पक्ष भाजपची ही योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. "लोकांनी पूर्ण जोर लावून मतदान केलं नाही, तर हे मॅच फिक्सिंगमध्ये यशस्वी होतील. ज्यादिवशी यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल, त्यादिवशी आपलं संविधान नष्ट होईल," असं राहुल गांधी म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यधोरण घोटाळाप्रकरणी अटक केल्याच्या निषेधार्थ ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लूसिव्ह अलायन्स’तर्फे (इंडिया) आज रविवार, ३१ मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात सभा संपन्न झाली.या सभेच्या निमित्ताने ‘इंडिया’तील सारे पक्षनेते पुन्हा दिल्लीत जमले होते. ‘हुकूमशहा हटवा, लोकशाही वाचवा’ अशी इंडिया आघाडीची घोषणा होती. इंडियातील प्रमुख नेत्यांसह केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता याही या सभेत सहभागी झाल्या होत्या होत्या. या सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर तसेच पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली.
राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी प्रमुख अखिलेश यादव, संजय राऊत, CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी-SCP अध्यक्ष शरद पवार, आप नेते आतिशी, गोपाल राय, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाही उपस्थित होते. या रॅलीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही सहभागी झाल्या होत्या.
गांधी पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची खाती गोठविण्यात आली आहे. नेत्यांना पैसे देऊन धमकावले जात आहे. पैशांनीच राज्ये सरकारे पाडली जातायेत. विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. विरोधी पक्षातील लोकांना जायबंदी करणे ही मॅच फिक्सिंग नाही तर काय आहे? असा प्रश्न विचारत चारशे पार करून जर भाजपने संविधानाला हात लावला तर देशात आग लागेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
अब की बार भाजपा तडीपार
यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी अब की बार भाजपा तडीपार नारा देत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला. रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या आंदोलनात उद्धव ठाकरे म्हणाले की, "ही काही निवडणुकीची सभा नाही. आपणास माहिती आहे की आपल्या दोन भगिनी मोठ्या हिमतीने लढत आहेत आणि त्यामुळे हे आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना साथ दिली पाहिजे. कल्पना (सोरेन) आणि सुनीता (केजरीवाल) यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अजिबात चिंता करू नका या लढाईत संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे असेही ठाकरे म्हणाले.