मुंबई : संविधानाच्या रक्षणासाठी आणि राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी वज्रमूठ सभेच्या माध्यमातून राज्यभर आवाज उठवत आहे.राज्यात विविध ठिकाणी सभा घेतल्यानंतर महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे संपन्न होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे.
राज्यात छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे संविधान रक्षणासाठी ‘वज्रमूठ’ सभा झाल्या. त्या सभेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार टीका सुरू आहे तसेच महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेते अजित पवार, जयत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेतेमंडळी सडकून टीका करीत आहे.
छत्रपती संभाजीनगर, नागपूर नंतर आता महाविकास आघाडीची पुढची ‘वज्रमूठ’ सभा मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे संपन्न होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेला सुरुवात होईल.
मुंबईत होणा-या ह्या सभेच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या पुढाकाराने महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवासैनिक ह्या नियोजनात सहभागी झाले आहेत.राज्यभरात महाविकास आघाडीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून मुंबईतील सभा अतिभव्य होईल अशी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना खात्री आहे.