वंचित बहुजन आघाडीची जरांगेसोबत नवी आघाडी !

Santosh Gaikwad March 27, 2024 04:14 PM



अकोला :  राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वंचितने पहिली यादी जाहीर करीत ९ उमेदवारांची घोषणा केली.  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबडेकर  यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबडेरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्यानं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या शक्यतांवर शिक्कामोर्तब झाला आहे.

  अकोल्यातील हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेविषयी बोलताना आंबेडकर म्हणाले, परिवर्तनाचे राजकारण जे आहे त्या परिवर्तनाच्या राजकारणाला नव्याने सुरुवात करण्याची चर्चा तिथे झाली. जास्तीत जास्त उमेदवार हे गरीब समुदायातील असतील आणि त्यांनाच पुढे आणले जाईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

आंबेडकर म्हणाले की, जे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, गरीब आहेत आणि काहीतरी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. बाकी जागांची अंतिम यादी ही २ तारखेपर्यंत जाहीर होईल. एक नवीन आघाडी आम्ही उभी करत आहोत, जे आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत त्यांना आम्ही सांगत होतो की, जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पण ते मान्य करायला तयार नव्हते. वंचित बहुजन आघाडीचा वापर हे घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते की, ज्याला आम्ही पूर्णपणे नाकारले आहे. आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लीम यांची नवीन वाटचाल आहे असे आम्ही मानतो. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्हाला आहे.

पहिल्या टप्प्यातील जे 'वंचित'चे उमेदवार आहेत त्यांना जरांगे पाटील यांचे समर्थन आहे. ३० तारखेला त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि लोकांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये कशा प्रकारे भाग घ्यायचा? आणि त्यात काय भूमिका घ्यायची? यावर त्यांनी लोकांचा निर्णय मागितला आहे. 30 तारखेनंतर काही जागांबाबत आम्ही दोघे मिळून निर्णय घेणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.