काँग्रेसने भाकरी फिरवली : मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती

Santosh Gaikwad June 09, 2023 11:32 PM


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच  काँग्रेसने मोठे बदल केले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना हटविण्यात आले आहे. त्यांच्याजागी  माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांनी नियुक्तीची घोषणा केली आहे.

वर्षा गायकवाड या मुंबईच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. या पदावर नियुक्ती झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून महिला, युवक किंवा सर्व जातीच्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आता मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी एका महिलेवर देण्यात आली आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. येणाऱ्या काळात निवडणुका आहेत, संघटनेत सर्वांना एकत्र घेऊन कसं जाता येईल, हे पाहाणार आहे.  माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न असेल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

काँग्रेस नेते, आमदार भाई जगताप म्हणाले, 'मला आनंद आहे की, वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा झाल्या आहेत. एका महिलेला अध्यक्ष केल्याबद्दल आनंद आहे. कृपया आमच्या बहीण-भावामध्ये भांडण लावू नका. वर्षाताई सारख्या काँग्रेसनिष्ठ व्यक्तीला मुंबई अध्यक्षपद देण्यात आले आहे, याचा आनंद आहे'. 'मला याची कल्पना होती, माहीत होत की मुंबई अध्यक्षपद बदलण्यात येत आहे. या पदासाठी अनेक नावं काँग्रेस समोर होती, पण वर्षा गायकवाड या योग्य आहेत. वर्षा गायकवाड चार वेळा आमदार राहिल्या आहेत.. प्राध्यापिका आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत काँग्रेससाठी काम केलं आहे, असे भाई जगताप पुढे म्हणाले.


वर्षा गायकवाड यांचा परिचय


दिवंगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या सक्रिय सदस्य आहेत. ३ फेब्रुवारी १९७५ रोजी त्यांचा जन्म झाला. २००४ च्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले आणि धारावी मतदारसंघातून निवडून आल्या. २००९ मध्ये त्यांनी पुन्हा विजयाची पुनरावृत्ती केली आणि उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री म्हणून काम केलं. २०१० ते २०१४ पर्यंत त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम केलं. पुढे त्यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. २०१४ मध्येही त्या धारावी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर त्या राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री झाल्या.