मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार वर्षाताई गायकवाड यांनी आज मंगळवारी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भव्य रॅली काढण्यात आली.
महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वर्षाताई गायकवाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी वांद्रे खेरवाडी जंक्शन येथून भव्य रॅलीला सुरुवात झाली. या प्रसंगी काँग्रेस नेत्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्यासह मित्र पक्षातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
यावेळी ढोल ताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही भव्य रॅली निघाली. फटाक्यांच्या आतषबाजीेत, फुले उधळीत वर्षाताईंचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. एका सजवलेल्या वाहनात उभे राहून उमेदवार वर्षाताई गायकवाड उंचावून जनतेला अभिवादन करत होत्या. यावेळी वर्षाताईच्या हातात संविधान हे मुख्य आकर्षण ठरले.
ढोल ताशांच्या गजरात, पंजाबी भांगडा डान्स आणि लेझीमच्या तालावर ही भव्य रॅली निघाली. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद चंद्र पक्ष, आम आदमी पक्ष या सर्व पक्षाचे हजारो कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
आपच्या कार्यकर्त्याच्या हातात जेल का जवाब व्होट से असे फलक होते, त्यावर दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो होता.
यावेळी कार्यकर्त्यांकडून ' वर्षाताई आयी है नयी रोशनी लायी है..,वर्षा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है ! आपली ताई हक्काची ताई अशी घोषणाबाजी करण्यात आली.
****