वसंत मोरे यांची शिवसेना ठाकरे गटात घरवापसी !

Santosh Gaikwad July 09, 2024 06:51 PM


मुंबई  :  शिवसेनेतून मनसेत, मनसेतून वंचित बहुजन आघाडीत आणि आता  पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास करीत वसंत मोरे यांनी  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे l शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.


मातोश्रीवर ठाकरे गटात सहभागी झाल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आयुष्यात १९९२ मध्ये कात्रज परिसरात पहिल्यांदा शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो. १६ वर्षांचा असताना कात्रज येथे शिवसेनेची शाखा स्थापन झाली, परंतु, वयाची १८ वर्षे पूर्ण होत नसल्यामुळे शाखा प्रमुख होता येत नव्हते. १९९२ मध्ये पहिला शाखा प्रमुख झालो. तेव्हापासून वयाच्या ३१ व्या वर्षापर्यंत उपविभाग प्रमुखापर्यंत गेलो. त्यानंतर मनसे पक्षात प्रवेश केला. अनेक जण म्हणतात की, वसंत मोरे यांचा शिवसेनेत प्रवेश आहे. परंतु, हा माझा प्रवेश नाही, तर मी परत एकदा शिवसेनेत आलो आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

पुणे शहराचे दोन्ही शाखाध्यक्ष माझ्यासोबत आहेत. गेली १५ वर्षे सातत्याने महानगरपालिकेत शहराचा विरोधी पक्षनेता होतो. प्रशासनासोबत माझे अतिशय चांगले काम आहे. या १० नगरसेवकांचे भविष्यात २५ पेक्षा जास्त नगरसेवक पुणे महापालिकेत येतील आणि यासाठी सर्वजण ताकद उभी करू.  माझ्यासोबत १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, एक शहराध्यक्ष, दोन सचिव, महिला आघाडीच्या ५ शाखाध्यक्ष शिवसेनेत परतत आहे. आम्ही सर्व स्वगृही परतलो आहोत, असे वसंत मोरे म्हणाले.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरो लोकसभा लढले, आता पुढे काय करणार, अशी चर्चा सुरू होती. परंतु, वसंत मोरे यांचे शेवटचे डेस्टिनेशन मातोश्रीच असणार, याची मला खात्री होती. त्यांची सुरुवात शिवसेनेपासून झालेली आहे. ते अधेमधे कुठेही गेले असले तरी मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक म्हणून शेवटी मातोश्रीच्या मंदिरात दाखल झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंना आशीर्वाद दिलेले आहेत. शिवसेना परिवारात ते सामील झालेले आहेत. ते शिवसेनेत आल्यामुळे नक्कीच पुणे आणि परिसरात ताकद वाढणार आहे. उद्धव ठाकरेंना मजबूत शिवसैनिक मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.