अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत : केसरकर यांचे आठवलेंना आश्वासन

Santosh Gaikwad May 26, 2024 04:43 PM


मुंबई दि.२६ - शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री   रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे.याबाबत आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मनुस्मृती चे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याबाबत तीव्र विरोध दर्शविला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक येणार नसल्याचे ठोस आश्वासन आठवले यांना दिले आहे.त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळालेला आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आहे.जातीभेद विषमता आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या भेदभावाच्या अनेक बाबी  मनुस्मृतिमध्ये  असल्यामुळे मानवतेच्या हक्कासाठी; विषमता  आणि जातीभेदाच्या अमानुष रूढी परंपरे विरुद्ध संगर म्हणून महामानव  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृती चे दहन करून सामाजिक क्रांति केली.त्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेल्या मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्यास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध असल्याचे ना.रामदास आठवलेंनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दूरध्वनी द्वारे सांगितले.त्यावर  केसरकर यांनी मनुस्मृती चे श्लोक अभ्यासक्रमात घेणार नसल्याचे आश्वासन  आठवलेंना दिले.