मुंबई, दि. १ः सोलापूर जिह्यातील सांगोला तालुक्यासह १० तालुक्यांमधील २९९ चारा छावण्यांचे २०२० पासूनचे अनुदान लवकरच वितरित केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली. शेकापचे जयंत पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर दिले.
मंत्री पाटील म्हणाले, २०१९-२० व २०२०-२१ मध्ये २४५ कोटी २३ लाख रुपये सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला होता. त्यापैकी २०६ कोटी ५५ लाख रुपये इतके अनुदान चारा छावणी चालकांना वितरित केला असून उर्वरित ३८ कोटी ६८ लाख इतका निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. सांगोला तालुक्याकरता १४६ चारा छावण्यासाठी १३१ कोटी ७७ लाख रुपये वितरित केले होते. त्यापैकी १०९ कोटी २० लाख निधी चारा छावणी चालकांना वितरित केले. उर्वरित २२ कोटी ५६ इतका निधी सुपूर्द केल्याचे पाटील म्हणाले. मंगळवेढा तालुक्या करीता ६१ चारा छावण्यांना ४७ कोटी ८१ लाख रुपये निधी वितरित केल्या. त्यापैकी ३३ कोटी १७ लाख इतका निधी प्रत्यक्षात चारा छावणी चालकांना वितरित केले. उर्वरित १४ कोटी ६४ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. यानंतर पुणे विभागीय आयुक्तांनी शासनाकडे ३८ कोटी ३४ लाख रुपये इतका रकमेच्या अनुदान मागणी प्रस्ताव सादर केला होता. या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढल्याने मागवलेला फेरअहवाल प्राप्त झाला आहे, हा फेरअहवाल लवकरच मंत्रिमंडळ उपसमिती समोर मांडला जाईल. त्यानंतर हे अनुदान वितरित करण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.