विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्षनेते : शिंदे, फडणवीस, पवार, पाटलांची टोलेबाजी !
Santosh Gaikwad
August 03, 2023 07:18 PM
मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेसचं संख्याबळ जास्त असल्याने विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला होता. अखेर विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विरोधी पक्षनेतेपदाच्या अभिनंदन प्रस्तावावर सभागृहात चांगलीच टोलबाजी रंगली होती. तर मनोरा आमदार निवासाच्या भूमिपुजनच्यावेळी मुख्यमंत्रयाच्या खुर्चीवर अजित पवार बसल्याने खुर्चीचा किस्सा चांगलाच गाजला.
अजित पवार यांच्याकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद होतं. तेच सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी झाल्याने राज्याला विरोधी पक्षनेता नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर विरोधीपक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला होता. अखेर विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सभागृहाकडून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.
शिंदेंचा ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्या स्वभाव आक्रमक आणि बेधडक आहे. राजकीय जीवनात त्यांनी सुरूवातीच्या प्रवासात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद, पंचायत समितीची निवडणुकांमध्ये त्यांनी नेतृत्व केलं आणि यशही मिळालं. विदर्भात शिवसेना वाढवण्याचं काम वडेट्टीवार यांनी केलं. बाळासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्रानुसार शिवसेनेनंतर काँग्रेसमध्येही त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं. खरं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. वर्क फ्रॉम होम काम करणारे नेते नाहीत ते रस्त्यावर उतरून काम करणारे नेते आहेत. काही लोकांना बाळासाहेबांचा सहवास लाभला तरी बाळासाहेबांचे संस्कार त्यांच्यावर झालेले दिसत नाही,असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
अजित पवारांचा काँग्रेसला टोमणा ...
अडचणीच्या काळातच वडेट्टीवारांकडे महत्वाची जबाबदारी दिली जाते आता लढा सत्ता आल्यानंतर आम्ही आहोतच अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका दिसते असा टोमणा अजित पवार यांनी यावेळी लगावला. मविआचे सरकार आल्यानंतर बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण यांना जशी खाती मिळाली तशी वडेट्टीवारांना मिळेल अशी आशा होती पण ती मिळाली नाहीत. त्यानंतर आपल्यात जे बोलणं झालं ते मी उघड करणार नाही मीशब्दाचा पक्का आहे पण कुठंतरी माणसाला दु:ख वेदना होता असे चिमटा अजितदादांनी काढला.
'यातील गमतीचा भाग सोडा. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मनावर घेऊ नये. टोमणे मारण्याचा माझा स्वभाव नाही असेही पवार म्हणाले.
फडणवीसांचा संग्राम थोपटेंना चिमटा …
विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर फडणवीस यांनी सभागृहात भाषण केले. फडणवीस म्हणाले, “आता माझ्या पदात बदल होणार नाही. माझ्यावर जी जबाबदारी आहे, त्यात मी समाधानी आहे. २०१९ वर्षांचे खरे हिरो आमचे शिंदे साहेब आहेत. वडेट्टीवारांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थोपटेंचा उल्लेख केला. ‘आता संग्राम थोपटेंचे काय होणार ? असा सवाल करीत, फडणवीसांनी थोपटेंना चिमटा काढला. त्यावरून सभागृहात हशा पिकला. ज्याला न्याय मिळत नाही, तिथे आम्हाला न्याय द्यावा लागतो. वडेट्टीवार आक्रमक असले तरी मृदू स्वभावाचे आहे, विरोधीपक्ष नेतेपदी ते चांगले काम करतील, असे फडणवीस म्हणाले.
हा इतिहास खरा होणार नाही : थोरात
काँग्रेसचे विधिमंडळातील नेते बाळासाहेब थोरात प्रतिक्रिया देताना म्हणाले की, यापूर्वी विरोधी पक्षनेता निवडला गेला की तो इतर पक्षात जातो हा इतिहास खरा असला तरी आमच्याकडे तसं काही होणार नाही. विजय वडेट्टीवार हे काँग्रेस विचारसरणीचे आहेत असं थोरातांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील- अजित पवारांमध्ये टोलेबाजी
जयंत पाटील म्हणाले विरोधीपक्षनेत्याचं महत्व एवढं आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात मागून येणाऱ्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी भाषणाकडे जास्त लक्ष द्यायला हवं. यावर लगेच देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, आमचं लक्ष इकडेच आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर आमचं दोघांचं लक्ष तुमच्याकडे आहे, मात्र तुमचचं आमच्याकडे लक्ष नाही, त्याला आम्ही काय करु, असा उपरोधिक टोला अजित पवारांनी लगावला. अजित पवारांच्या या विधानावरुन जयंत पाटलांसह सभागृहातील सर्व आमदार खळखळून हसू लागले. तसेच मुख्यमंत्री सभागृहातील भाषण लक्ष देऊन ऐकताय. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष देण्यास तयार नाही. मुख्यमंत्र्यांनी आता ठरवलं पाहिजे की, नंबर वन उपमुख्यमंत्री कोण आणि नंबर टू उपमुख्यमंत्री कोण?, अजितदादांनी यावर देखील लगेच प्रत्युत्तर दिलं. नंबर वन हे (फडणवीस) आणि नंबर टू मी…यानंतर सभागृहात एकच हसा पिकला. पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याच्या खूर्चीची पूजा केली पाहिजे. कारण जो त्या खुर्चीवर बसतो. तो तिकडे जाऊन बसतो असा टोलाही जयंत पाटील यांनी अजित पवारांना लगावला.
-------