पुण्यातील अपघातप्रकरणी विशाल अग्रहवालला तीन दिवसाची पोलीस कोठडी

Santosh Gaikwad May 22, 2024 07:17 PM


पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा बिल्डर वडील विशाल अगरवाल याला पुणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अगरवाल याच्यासहित तिघांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षाकडून विशाल अगरवाल याच्या सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. 


पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या बिल्डर वडील विशाल अगरवाल याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. पुण्यातील कल्याणीनगर भागातील या बिल्डरच्या मुलाने शनिवारी मध्यरात्री दुचाकीवरील दोन जणांना उडवले होते. त्यात तरुण व तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला न्यायालयात सादर केले असता, तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी बिल्डर विशाल अगरवालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच, अगरवाल पुण्यातून फरार झाला होता.​ अखेर मंगळवारी पहाटे पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अगरवाल याला ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी दुपारी त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याच्यावर वंदे मातरम संघटनेकडून शाईफेकीचा प्रयत्न झाला.