सरकारची लाडका मित्र योजना, मुंबईला अदानी सिटी होऊ देणार नाही : उद्धव ठाकरेंचा इशारा

Santosh Gaikwad July 20, 2024 03:17 PM



मुंबई : धारावीकरांना जागेवरच ५०० चौ.फुटाचे घर मिळाले पाहिजे. मात्र धारावीचा भूखंड अदानीच्या घशात घालून मुंबईला अदानी सिटी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डाव आहे. सरकारची लाडका मित्र किंवा लाडका काँट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती योजना सुरु आहे. मात्र एकाही धारावीवासियाला तिथून हाकलू देणार नाही. मुंबईला अदानी सिटी होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद दिला. यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाई पत्रकार परिषदेत उपस्थित होते. 

उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेवर टीका केली. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार फसव्या योजनांचा पाऊस पाडत आहे.त्यांना वाटतंय की योजनांना लोक भुलतील. गेल्या वर्षी आम्ही धारावीत मोर्चा काढला होता.आमची मागणी आहे की, तिथेच धारावीकरांना पाचशे स्क्वेअर फुटांचे घर मिळालंच पाहिजे, ही आमची मागणी आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

मुंबईला अदानी सिटी बनवण्याचे काम सुरू आहे.मुंबईत लुटून भिकेला लावायचे यांचे काम सुरू आहे. टेंडरमध्ये नसलेल्या गोष्टी अदानीला दिल्या जातायत.५९० एकरची जागा आहे. आता एफएसआयचा वर्षाव सुरू केलाय. धारावीकरांना अपात्रतचे निकष लावून बाहेर काढले जातायत. नागरी संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुर्लाची मदर डेअरी,दहीसर टोलनाका, मुलूंडची जागा, मिठागरेसह २० जागा अदानीला दिल्या जातायत. लाडक्या मित्रासाठी जागा दिल्या जात आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.

धारावी केवळ झोपडपट्टी नसून तिथे एक इंडस्ट्रियल इस्टेट आहे. तिथे प्रत्येक घरांत मायक्रोस्केल उद्योग चालतो. त्यात कुंभार आहेत. चामडे उद्योग आहेत. मोदी-शाह मुंबईला अदानी सिटी करणार आहेत. उद्या कदाचित मुंबईचं नावही बदलून अदानी सिटी करतील, पण आम्ही धारावीवासियांना उद्ध्वस्त करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. हे मुंबईला भिकेला लावण्याचं कारस्थान आहे, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे. आमचं सरकार आल्यानंतर धारावी टेंडर रद्द करू आणि धारावीकरांचे तेथेच पुनर्वसन करू तसेच त्यांच्यासाठी नवीन इंडस्ट्रिअल इस्टेट बांधून देऊ असे ठाकरे म्हणाले.

*****