मुंबई, दि. २९ मे : राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील ७५ टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरळपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सुट्टीवर गेले आहेत पण काँग्रेस पक्ष जनतेला न्याय देण्यासाठी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असून प्रत्येक विभागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिले जाईल. ३१ मे पासून या दौऱ्याला सुरुवात होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते, महायुती सरकारवर प्रहार करत नाना पटोले पुढे म्हणाले की, पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. सरकारी अनास्थेमुळे टँकर माफियांचा सुळसुळाट सुरु आहे. पाण्याच्या टँकरला जीपीएस लावल्याचे सरकार सांगत आहे पण तो जीपीएस काढून मोटारसायकलला लावला जातो. सरकार पाण्याच्या टँकर माफियांकडूनही पैसे वसूल करते की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारला आचार संहितेचा अडसर येतो पण टेंडरसाठी आचारसंहिता आडवी येत नाही. आपत्तीमध्ये निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मदत देता येते. उद्या संध्याकाळी छत्रपती संभाजी नगरला जाऊन ३१ तारखेपासून दुष्काळ पाहणी दौरा केला जाईल व आयुक्तांना भेटून माहिती दिली जाईल आणि ४ जूननंतर पुन्हा दुष्काळी पाहणी दौरा केला जाणार आहे. मराठवाडा विभागात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उत्तर महाराष्ट्रात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अमरावती भागात माजी मंत्री यशोमती ठाकूर तर कोकण विभागात प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ शेतात जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहे.
*पुणे अपघात प्रकरणी एसआयटी चौकशी दिशाभूल करणारी*
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी राज्य सरकार लपवालपवी करून बगलबच्च्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समितीच्या डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत, त्यांच्याकडे भाड्याची गाडी आहे, त्याचे महिन्याचे भाडे लाखात आहे. डॉ. सापळे या मिरज हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी केलेले कारनामे सर्वांना माहित आहेत. असा भ्रष्ट अधिकारी निष्पक्ष तपास कसा काय करु शकतो? या प्रकरणातील डॉक्टर, पोलीस व राजकीय नेत्यांना वाचण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून सीबीआय चौकशी केली पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी आहे.
पुणे अपघात प्रकरणी कोणत्या मंत्र्याने फोन केले, त्या गाडीत कोण कोण होते, त्यांची नावे का पुढे येत नाहीत? सरकार लपवालपवी कशासाठी करत आहे? ज्या पबमधून ही मुले निघाली त्यावेळी दोन गाड्या होत्या, त्यांनी गाड्यांची रेस लावली होती व त्यातूनच हा अपघात झाला व दोघांना चिरडले. ससून हॉस्पिटमधील डॉ. तावरे यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले, यासाठी डॉ. तावरेंना कोणी फोन होता? गाडी का बदलण्यात आली? त्या पबमध्ये एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण? हे राज्य सरकारने स्पष्ट केले पहिजे. डॉ. तावरे यांनीच सर्वांची नावे उघड करेन असे सांगितल्याने त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे सरकारने डॉ. तावरेंना सुरक्षा दिली पाहिजे. या प्रकरणात डॉ. तावरे महत्वाचा धागा आहेत, तो महत्वाचा पुरावा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
*काँग्रेस विधान परिषदेच्या दोन जागा लढवणार*.
काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या दोन जागा लढवणार आहे. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. २ जूनला उमेदवारांची घोषणा केली जाईल असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
००००००००