महिलांना घरु​न एफआयआर दाखल करता येणार ​: नरेंद्र मोदींची घोषणा

Santosh Gaikwad August 25, 2024 10:10 PM


जळगाव :  महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कडक कायदे करणार आहोत, महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे, महिलांना घरु​न एफआयआर दाखल करता येणार आहे ​अशी घोषणा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जळगावात लखपती दीदी या कार्यक्रमात बोलताना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरूवात करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातातील मृतांना श्रद्धाजंली वाहिली.

  मोदी म्हणाले की, महिलांवर अत्याचार हे पाप आहे. महिलांवर अत्याचार करणारे वाचले नाही पाहिजे. हॉस्पिटल, शाळा किंवा पोलीस व्यवस्था जिथे निष्काळजीपणा होत असेल तिथे कारवाई व्हायला पाहिजे. वरून खालीपर्यंत मेसेज थेट जायला पाहिजे. सरकार येतील, जातील, पण जीवनाची आणि नारीची रक्षा सरकार म्हणून आपले दायित्व आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी कायदे करत आहोत, असं मोदी म्हणाले.

पूर्वी वेळेवर एफआयर होत नव्हता. अशा अनेक अडचणींना आम्ही भारतीय न्याय संहितामध्ये पर्याय दिला आहे. पीडित महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जायचं नसेल तर ती ई- एफआयर करू शकते. अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारासाठी फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा नव्या कायद्यात आहे, असं मोदी म्हणाले.


लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी- सीएम शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी झाल्या आहेत. जळगाव ही सोन्याची भूमी असून माझ्या बहिणी सोन्यापेक्षा सरस आहे. आमच्या सरकारकडून महिलांना 3 सिलिंडर मोफत देण्यात येत आहे. मोदींच्या काळात 10 कोटी महिला स्वावलंबी झाल्या आहेत.