मणिपूर : मणिपूरमधील दोन महिलांना जमावाने नग्न करत धिंड काढली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी (२० जुलै) आता या दोन पीडितेपैकी एका महिलेने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत आपली कैफियत सांगितली आहे. यात तिने पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. तसेच मणिपूरच्या मुलींबरोबर झालेला प्रकार कधीही माफ केला जाऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं.
मोदी म्हणाले, “माझं मन दुःख आणि रागाने भरलं आहे. मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे त्याच्या जागेवर आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावलं आहे. १४० कोटी देशवासीयांना खाली पहावं लागत आहे.”
“मी सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह करतो की, त्यांनी आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था मजबूत करावी. आपल्या आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावलं उचलावीत. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची असो, या देशात कोणत्याही भागात, कोणत्याही राज्यात राजकीय वादापलिकडे जाऊन कायदा सुव्यवस्था, महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
वयवर्षे २० आणि ४० असलेल्या या दोन पीडित महिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात काही लोक या महिलांना नग्न करत धिंड काढताना रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. इतकंच नाही, तर जमावातील लोकांनी या महिलांच्या शरीराला ओरबाडत शारीरिक अत्याचारही केले.
२० वर्षीय पीडित महिलेने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, जमाव त्यांच्या गावावर हल्ला करत होता तेव्हा पोलीसही हजर होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तेथून सोबत घेतलं. काही अंतरावर गेल्यावर पोलिसांनी महिलांना रस्त्यावर जमावाबरोबर सोडून दिलं. त्यांना पोलिसांनीच जमावाच्या हवाली केलं. इतकंच नाही, तर जमावाने पीडित महिलेचे वडील आणि भाऊ यांची कथितपणे हत्या केली.
या प्रकरणावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. यावरून आता देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे.
मणिपूरमध्ये हैवानांचे राज्य, सरकार तात्काळ बरखास्त करा
मणिपूरमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात दोन महिलांची जमावाने नग्नावस्थेत धिंड काढल्याचे पाहायला मिळाले. ज्याने हा व्हडिओ पाहिला त्या प्रत्येकाला धक्का बसला आहे. याबाबत पीएम मोदी म्हणाले, 'माझ्या मनात क्रोध भरला आहे. कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी ही लाजिरवाणी घटना आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, 'आम्ही समोर व्हिडिओमुळे खूप व्यथित झालो आहोत.' ही घटना 4 मे 2023 ची आहे.
त्या दिवशी काय घडले, गुन्हा केव्हा दाखल झाला, एफआयआरमध्ये काय आहे आणि अडीच महिन्यांनी हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला,
पीडितेच्या व्यथा तिच्याच शब्दांत: जीव वाचवण्यासाठी कपडे काढले
मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर 4 मे रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील बी फेनोम गावाजवळ हल्ला झाला. यादरम्यान जमावाने तीन कुकी महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढली. यादरम्यान एका महिलेवर भरदिवसा बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
व्हिडिओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावरुन फिरवले जात असल्याचे दिसत आहे. अनेक तरुण पुरुष त्यांच्या बाजूने चालताना दिसतात, तर इतर पुरुष अस्वस्थ दिसणार्या महिलांना शेतात ओढत आहेत.
न्यूज वेबसाइट स्क्रोलने तीन पीडितांपैकी एकीशी बोलून याबाबत जाणून घेतले. त्यावर 40 वर्षीय महिलेने सांगितले, 'जेव्हा आम्ही ऐकले की मेईतेई जमाव जवळच्या गावात घरे जाळत आहे, तेव्हा आमचे कुटुंब आणि इतर लोक पळून गेले, परंतु जमावाने शोधून काढले. आमच्या शेजारी आणि त्याच्या मुलाला थोड्या अंतरावर नेऊन मारले. यानंतर जमावाने महिलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आणि आम्हाला कपडे काढण्यास सांगितले.
पीडित महिला म्हणाली की, 'आम्ही याला विरोध केला. त्यानंतर त्यांनी कपडे काढले नाही तरजीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. यानंतर मी स्वत:ला वाचवण्यासाठी कपडे काढले. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मला मारहाण आणि धक्काबुक्की केली. माझ्या शेजारच्या 21 वर्षीय तरुणीबरोबर काय होत आहे ते मला कळले नाही, कारण ती काही अंतरावर होती.
महिलेने आरोप केला की, "मला रस्त्यालगतच्या शेतात ओढले आणि पुरुषांनी मला लोटायला सांगितले. त्यानंतर मी शेतात लोटले. तीन जणांनी मला घेरले होते. तेव्हा एकाने दुसऱ्याला म्हटले - चला तिच्यावर बलात्कार करू, पण त्यांनी तसे केले नाही. मी भाग्यवान होते की माझ्यावर बलात्कार झाला नाही, पण त्यांनी माझ्या शरीराला स्पर्श केला.
एफआयआरनुसार: महिलेवर बलात्कार, वाचवण्यासाठी आलेल्या भावाची हत्या
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना 4 मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली आणि कांगपोकपी जिल्ह्यात 18 मे रोजी झिरो ने एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण थोबाळ येथील संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले.
अपहरण, सामुहिक बलात्कार आणि खून या कलमांतर्गत अज्ञातांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला, पण अटक करण्यात आली नाही. अडीच महिन्यांनंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 1 अटक झाल्याचे समोर येत आहे.
बुधवारी म्हणजे 19 जुलै रोजी संध्याकाळी एका प्रेस नोटमध्ये मणिपूरचे पोलिस अधीक्षक के मेघचंद्र सिंह म्हणाले की, राज्यातील पोलिस गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत.
एफआयआरनुसार…
- 4 मे रोजी दुपारी 3 च्या सुमारास कांगपोकपी जिल्ह्यातील आमच्या फिनोम गावात सुमारे 800-1000 लोक घुसले. त्यांच्याकडे AK-47, SLR, INSAS आणि 303 रायफल यांसारखी आधुनिक शस्त्रे होती. त्यांनी घरांची तोडफोड केली, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भांडी, कपडे आणि रोख रक्कम लुटून घरांना आग लावली.
- हल्लेखोर मेईतेई युथ ऑर्गनायझेशन, मेईतेई लिपुन, कांगलीपाक कानबा लूप, आरामबाई टेंगोल, वर्ल्ड मेईतेई काऊन्सिल आणि अनुसूचित जमाती मागणी समितीचे असल्याचा संशय आहे.
- या घटनेत गावातील पाच जणांचा समावेश असून ते जीव वाचवण्यासाठी जंगलाकडे पळत होते. त्यात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. यातील तिघे एकाच कुटुंबातील होते.
- एक 56 वर्षांचे व्यक्ती, त्यांचा 19 वर्षांचा मुलगा आणि 21 वर्षांची मुलगी तसेच दोन इतर महिला, एक 42 वर्षांची आणि दुसरी 52 वर्षांची, देखील या गटाचा भाग होत्या.
- जंगल मार्गावर नॉन्गपोक सेकमाई पोलिस स्टेशनच्या पथकाने त्यांची सुटका केली. नॉन्गपोक सेकमाई पोलिस स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तुबूजवळ हिंसक जमावाने त्यांना थांबवले आणि पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेतले.
- जमावाने लगेचच 56 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. त्यानंतर तिन्ही महिलांना कपडे उतरवण्यास भाग पाडण्यात आले आणि जमावासमोर त्यांना विवस्त्र करण्यात आले. यानंतर 21 वर्षीय महिलेवर भरदिवसा क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला.
- 21 वर्षीय महिलेच्या लहान भावाने बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही जमावाने मारले. इतर अन्य दोन महिला परिसरातील काही परिचितांच्या मदतीने घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. दोन्ही महिला सध्या मदत छावण्यांमध्ये आहेत.
- व्हिडिओमध्ये फक्त दोन महिला दिसत आहेत. पण तिच्या पन्नाशीतील आणखी एक एक महिला होती जिला जमावाने बळजबरी विवस्त्र केले होते.
इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) कडून महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आयटीएलएफ गुरुवारी आंदोलन करणार होते. या व्हिडीओच्या माध्यमातून ते समाजाच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच संताप पसरला.
घटनेची दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी ट्रायबर्स लीडर फोरमने राज्य, केंद्र सरकार, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे.
महिलांचा हत्यार म्हणून वापर
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात महिलांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 4 जून रोजी मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात जमावाने एक रुग्णवाहिका जाळली. आठ वर्षांचा मुलगा, त्याची आई आणि रुग्णवाहिकेत प्रवास करणाऱ्या अन्य एका नातेवाईकाचा त्यात मृत्यू झाला.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, गोळीबाराच्या घटनेत मुलाच्या डोक्यात गोळी लागली होती. त्याची आई आणि नातेवाईक त्याला इंफाळ येथील रुग्णालयात घेऊन जात होते. पीडितेची आई मेईतेई समाजाची असून तिचे एका कुकीशी लग्न झालेले होते.
पोलीस म्हणाले, “या प्रकरणाचा…”
या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं.
पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडीओबाबत निवेदन जारी केलं. ते म्हणाले, “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
“या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य पोलीस दल आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे,” असंही पोलिसांनी नमूद केलं.
VIDEO सोशल मीडियावरून हटवा”, महिला आयोगाचे ट्विटरला निर्देश
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) ने ट्विटर इंडियाच्या पब्लिक पॉलिसी प्रमुखांना संबंधित व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. दोन महिलांना नग्नावस्थेत धिंड काढणं ही लज्जास्पद बाब आहे. या व्हिडीओंमधून पीडित महिलांची ओळख सार्वजनिक होत आणि हा दंडनीय गुन्हा आहे, असं महिला आयोगानं आदेशात म्हटलं आहे.
मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर वक्तव्य...
- मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले की, हा मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत.
- काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विटमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना टॅग केले आणि म्हटले की, एक महिला असून तुम्ही गप्प बसून हे सर्व कसे बघू शकता.
- काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या की, समाजातील हिंसाचाराचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलांना सहन करावा लागतो.
मेईतेई समुदायाने मृतदेहांचा व्हिडिओ केला शेअर
या महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मेईतेई समुदायाकडून एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात अनेक लोकांचे मृतदेह दिसत आहेत. व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, हा व्हिडिओ जून महिन्याचा आहे. तेव्हा कुकी समुदायाने सुगनू परिसरातील मेईतेई गावांमध्ये लोकांना मारले होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने देशातील सर्व मीडिया हाऊस, केंद्रीय मंत्री आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनाही टॅग केले आहे.