दिल्ली: दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या IBA जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. स्वीटी बूरा हिने ८१ किलो वजनी गटात चीनच्या वांग लीना हिला हरवून सुवर्णपदक जिंकले. स्वीटीने हा सामना ४-३ अशा फरकाने जिंकला. स्वीटीने पहिल्या फेरीपासूनच चिनी बॉक्सरवर वर्चस्व राखले. तिने पहिल्या फेरीतच चिनी बॉक्सरच्या चेहऱ्यावर जोरदार पंचेस लगावले आणि पहिली फेरी ३-२ अशी जिंकली.
महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नीतू घंघास नंतर आता स्वीटी बुराने सुवर्णपदक जिंकले आहे. स्वीटी बूरा हिने ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने अंतिम सामन्यात चीनच्या वांग लीनाचा पराभव केला. अशाप्रकारे भारताचे हे आजचे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी नीतू घंघासने मंगोलियन बॉक्सरचा पराभव करून भारताला दिवसातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. आता स्वीटी बुराने चीनच्या खेळाडूला हरवून दुसरे सुवर्णपदक भारताच्या झोळीत टाकले आहे. त्याच वेळी, याआधी नीतू घंघासने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.
नीतू घंघास हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले
भारतीय बॉक्सर नीतू घंघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीतू घंघासने ४८ किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुत्सेखान अल्टेंगसेंगचा पराभव केला. भारतीय बॉक्सरने हा सामना ५-० असा जिंकला. तत्पूर्वी, शनिवारी नीतू घंघासने उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव केला. त्याचवेळी स्वीटी बूराने भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
निखत झरीन आणि लव्हलिना बोरगोहेन यांनीही महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. निखत झरीन आणि लव्हलिना बोरगोहेन २६ मार्च रोजी अंतिम फेरीत भिडतील. अशा प्रकारे, ४ भारतीय बॉक्सर महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकले. नीतू घंघास व्यतिरिक्त, स्वीटी बूरा, निखत झरीन आणि लव्हलिना बोरगोहेन यांनीही अंतिम फेरी गाठली. मात्र, नीतू घंघास आणि स्वीटी बूरा यांच्यानंतर आता भारतीय चाहत्यांच्या नजरा निखत झरीन आणि लव्हलिना बोरगोहेन यांच्यावरही असतील.
नऊ वर्षांपूर्वी स्वीटीला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता सुवर्णपदक जिंकून तिने ही अडचण दूर केली आहे. यावेळी, ३० वर्षीय स्वीटीने सुवर्णपदक जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न केले आणि २०१८च्या विश्वविजेत्या वांग लीनाला तिच्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. २०१४ मध्ये दक्षिण कोरियामध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्वीटी बूराला चीनच्या यांग झियाओलीकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि आता तिने चीनच्या बॉक्सरला हरवून सुवर्णपदक जिंकले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल स्वीटी बूराला ८२.७ लाख रुपये मिळणार आहेत. रविवारी, सध्याची जगज्जेती निखत झरीन आणि टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेन यांच्यात अंतिम लढत होणार आहे.