टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत जनसागर उसळला !
Santosh Gaikwad
July 04, 2024 09:54 PM
ढोल ताशांच्या गजरात वर्ल्ड चॅम्पियन थिरकले ....
मुंबई : गर्दीचा उसळलेला जनसागर, फुलांचा वर्षाव, घोषणांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात गुरूवारी वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचे मुंबईकरांनी प्रचंड उत्साहात स्वागत केले. टीम इंडियाची ओपनडेक बस मधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लाखो मुंबईकर सहभागी झाले होते. टीम इंडियाने तिरंगा, वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावत मुंबईकरांच्या प्रेमाचा आणि शुभेच्छा स्वीकार केला. यावेळी ढेाल ताशांच्या गजरात वर्ल्ड चॅम्पियन थिरकले.
२००७ साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं. यंदा बार्बाडोसमध्ये टीम इंडियानं दुस-यांदा टी २० वर्ल्डकप जिंकला. त्यामुळे क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे. तब्बल १७ वर्षानंतर टीम इंडियाने देशाला टी २० विश्वचषक जिंकून दिल्याने क्रिकेट चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मरिन ड्राईव्हवर तोबा गर्दी केली होती. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी करण्यात आली.
नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह परिसरात नेहमी पर्यटक येत असतात. मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर समुद्राला येणारं उधाण, समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी नेहमी गर्दी बघायला मिळते. पण आज मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर क्रिकेट चाहत्यांचा भलामोठा जनसागरच लोटला होता. अबालवृध्द सगळेच उत्साहात सामील झाले होते.
मुंबई विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. क्रिकेट चाहत्यांची गर्दी इतकी वाढली होती कि पोलिसांना नियंत्रणात आणताना नाकीनऊ येत होते. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर टीम इंडिया एका बस मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झाले. यावेळी या मार्गावरील रस्त्यावर चौका, चौकात रस्त्याच्या दुतर्फा लाखो मुंबईकर स्वागतासाठी उभे होते. प्रत्येकजण जल्लोष करीत हात उंचावीत टीम इंडियाला शुभेच्छा देत होते. टीम इंडियाने प्रतिसाद देत हात उंचावत अभिवादन केले. हजारो क्रिकेट प्रेमींमध्ये एकच जल्लोष पसरला होता. वरूण राजाने हजेरी लावली मात्र मुंबईकरांचा उत्साह वाढतच हेाता. ओपनडेक बस मधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली या विजयी मिरवणुकीत लाखो मुंबईकर सहभागी झाले होते.
*****