बीओबी टेबल टेनिस स्पर्धेत अंकित, कविता विजेते
Santosh Sakpal
September 10, 2024 08:19 PM
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय निवड चाचणी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये अंकित धीकोनियाने पुरुष गटात व कविता राणाने महिला गटात विजेतेपद पटकाविले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने ग्रँट रोड येथील वायएमसीए टेबल टेनिस हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंकित धीकोनियाने व्ही. कुलदीपचा ११-४, ११-४, ११-४ असा सहज पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. प्रथमपासून आघाडीचे वर्चस्व राखणाऱ्या अंकितचे अचूक जोरकस फटके परतविण्यास अपयश आल्यामुळे व्ही. कुलदीपला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
कविता राणा विरुद्ध कृतिका यामधील महिलांची अंतिम लढत अटीतटीची झाली. दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करीत १-१ अशी बरोबरी साधणाऱ्या कृतिका अग्रवालला अखेर कविता राणाने ११-६, ३-११, ११-७ असे चकविले आणि कविताने प्रथम क्रमांकावर झेप घेतली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेबल टेनिस पंच सीताराम गमरे, बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले. अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या बँक ऑफ बडोदा आंतर विभाग टेबल टेनिस स्पर्धेसाठी मुंबई विभागीय संघाचे प्रतिनिधित्व पुरुष गटामध्ये अंकित धीकोनिया, व्ही. कुलदीप, आशिष दवे, अभी चटोपाध्याय तर महिला गटामध्ये कविता राणा, कृतिका अग्रवाल, प्रार्थना मस्तुल, क्लॅरेट पी. आदी टेबल टेनिसपटू करणार आहेत.
*****************************************************************************