दिल्लीचा गुजरातवर २४ चेंडू राखून शानदार विजय, WPLच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स; शफाली वर्माची शानदार खेळी

Santosh Sakpal February 25, 2025 11:23 PM

दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा संघाने गुजरात जायंट्स संघावर एकतर्फी ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीच्या मारिजन कापने भेदक गोलंदाजी करत गुजरात संघाचं कंबरड मोडलं. मारिजन काप टी-२० सामन्यात २ विकेट मेडन षटक टाकत गुजरात संघाला धावा करण्याची संधी दिली नाही. यासह गुजरातने दिल्लीला अवघ्या १२७ धावांचे आव्हान दिले. तर दिल्लीने १६व्या षटकात १३१ धावा करत शानदार विजय मिळवला. या विजयासह दिल्लीचा संघ WPL २०२५ च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

१२८ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खास झाली नाही. कर्णधार मेग लॅनिंगने १३ चेंडूत ३ धावा केल्या. ती बाद झाल्यानंतर शफाली वर्मा आणि जेस जोनासेन यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी मिळून ७४ धावांची भागीदारी केली. शेफाली वर्माने २७ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. शेफाली वर्माने मेग लॅनिंगच्या विकेटनंतर संघाचा डाव सावरला तर जोनासनबरोबर उत्कृष्ट भागीदारी रचली.

महिला प्रीमियर लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शानदार गोलंदाजी करत गुजरात जायंट्सला २० षटकांत ९ गडी गमावून १२८ धावांवर रोखले. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघातील वेगवान गोलंदाजी आक्रमणाने हा निर्णय अगदी योग्य असल्याचे सिद्ध केले.

गुजरातकडून डिएंड्रा डोटिनने २६ धावा, तनुजा कन्वरने १६ धावा तर भारती फुलमाली हिने ४० धावांची खेळी केली. याशिवाय संघाचे सर्व खेळाडू स्वस्तात बाद झाले. दिल्लीकडून शिखा पांडेने २ विकेट्स, मारिजन कापने २ विकेट्स, एनाबेल सदरलँडने २ विकेट्स घेतले. तर तितास साधू आणि जोनासनने प्रत्येकी १ विकेट घेतली.