तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या
Santosh Gaikwad
March 17, 2023 12:00 AM
डोंबिवली : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी सीसीटिव्हीच्या सहायाने एका तोतया पोलिसाला बेड्या ठोकल्या असून तो वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून काम करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दिलीप पाटील (37, रा.जळगाव) असे या तोतया पोलिसाचे नाव आहे.
कल्याण नेतीवली भागात राहणारे इंद्रजीत गुप्ता(27) हे दुपारी मेट्रो मॉल समोरील रोड वरून दुचाकीने जात असताना दोघांनी त्यांचा रस्त्यात अडवले.आम्ही पोलीस असून तुमची चौकशी करायची आहे असे सांगून ते दोघे इंद्रजित यांची 30 हजारांची दुचाकी घेऊन पसार झाले .यानंतर इंद्रजीत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला. पोलीसांनी त्यावरून कसोशीने तपास करून सीसीटिव्हीच्या मदतीने अवघ्या तीन तासाच्या आत दिलीप पाटील (37, रा.जळगाव) या तोतया पोलिसाला बेड्या ठोकल्या. या तोतया दिलीपने अशाच प्रकारे पोलीस असल्याची बतावणी करून किती नागरिकांना लुटतले आहेत या सर्व बाजूने पोलीस तपास करीत आहेत. तसेच त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेत असून अटक पाटील याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का या सर्व बाजूने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे सांगितले.