मुंबई प्रतिनिधी (केतन खेडेकर)
मुलुंड (पश्चिम) येथे प्रस्तावित पक्षी उद्यानाच्या उभारणी संदर्भात नगर विकास विभागाला मुंबई महापालिकेने भुखंड आरक्षण बदलास पाठवलेल्या प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. मुलुंडच्या या नियोजित उद्यानात १८ दुर्मीळ प्रजातींसह २०६ प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून या पक्षी उद्यानाच्या कामाला लवकरच प्रारंभ होईल, अशी माहिती मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी दिली.
या महिन्याच्या सुरुवातीला, मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुलुंडमधील विविध विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेतली होती. पक्षी उद्यानाच्या विकासासाठी विविध सरकारी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार मिहिर कोटेचा म्हणाले की, त्यांच्या विनंतीनुसार, मुंबई प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांनी जानेवारी २०२४ मध्ये नाहूर भूखंडाचे आरक्षण बदलण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. पूर्वी, हा भूखंड बाग/पार्कसाठी राखीव
होता. महापालिकेने त्यावर सूचना हरकतींची प्रक्रिया सप्टेंबर मध्ये पूर्ण केली. जानेवारी २०२५ मध्ये नगरविकास विभागाला प्रस्ताव सादर केला. नगररचना संचालकांनी फेब्रुवारीमध्ये यासंदर्भातला अहवाल दिला असून ७ एप्रिल रोजी नगरविकास विभागाने भूखंडाच्या आरक्षण फेरबदल्यास मंजुरी दिल्याची अधिसूचना जारी केली आहे, असे आमदार कोटेचा यांनी सांगितले.
नाहूर येथील सीटी सर्वे क्रमांक ७०६, ७१०, ७१२, ७६२, ७६३ या उद्यान व प्राणीसंग्रहालयासाठी राखीव असलेल्या भूखंडातील १७९५८ चौ. मी. क्षेत्रफळ
पक्षी उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. प्रस्तावित मुलुंड पक्षी उद्यान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे (भायखळा) उपकेंद्र असणार आहे. आमदार कोटेचा यांच्या निवेदनानंतर मुंबई महापालिकेने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) मुलुंड पक्षी उद्यानाचा आराखडा सादर केला होता.
या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी पक्षांची विभागणी असणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड,पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ऑस्ट्रिच, स्कॉलेट, स्कॉलेट, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या दुर्मिळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत.