आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन, शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाला पाठींबा

Ketan khedekar May 09, 2025 04:41 PM


मुंबई - राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कामगार रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्यअध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. 

भर पावसात झालेल्या आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला. राज्यातील सर्व रुग्णालये व विभागातील वर्ग-ड ची रिक्त पदे सरळसेवेने तात्काळ भरुन, सध्या सुरु असलेले खाजगीकरण/कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना किमान मूळवेतन १८ हजार मिळावे. मनोरुग्णालयातील ६३४ सफाईगारांची पदे पुनर्जिवित करावित. १४ एप्रिल १९८१ च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास शासनसेवेत सामावून घ्यावे. तसेच कामगार विमा योजनेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे नवीन सेवाप्रवेश नियम तात्काळ तयार करावेत, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार कामगार नेते सचिन अहिर आणि आमदार आमदार मनोज जामसुतकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत येत्या अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याच जाहीर केले. सरकारने लवकरात लवकर गांभिर्याने होत निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन बेमुदत केले जाईल. असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी आझाद मैदानात दिला. यावेळी आमदार मनोज जामसुतकर यांनीही या कामगाराच्या मागण्यांवर सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करुनही शासन दखल घेत नसल्याने बुधवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले आहे असे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सुरेश आहेरकर,मार्तंड राक्षे, बाबाराम कदम यांनी सांगितले.

या आंदोलनाचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी ५ ते ६ मे रोजी राज्यभर काळ्या फिती लावून निदर्शने केली. तरीदेखील शासनाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष लक्षात घेता  आजचे हे लक्षवेधी धरणे आंदोलन केले करण्यात आले असल्याची माहिती सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर, करण सोनवणे यांनी यावेळी दिली.

सर्व रुग्णालये व विभागातील वर्ग-ड ची रिक्त पदे सरळसेवेने तात्काळ भरुन, सध्या सुरु असलेले खाजगीकरण/कंत्राटीकरण धोरण रद्द करावे, मनोरुग्णालयातील ६३४ सफाईगारांची निरसित केलेली पदे पुनर्जिवित करावीत असे भगवान शिंदे,रामभाऊ पांचाळ,योगिता सोनवणे यांनी सांगितले.

फोटोओळ

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कामगार रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्यअध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.