मुंबई प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील पाचवी अर्थव्यवस्था होण्याचा मान भारताला मिळालेला आहे. त्यामुळे आपण सत्तेकरीता जन्माला आलेलो नसून, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी सत्ता हे एक साधन आहे. या दोन्ही गोष्टींच्या लढाईतील उपकरण म्हणून आपण सत्तेकडे पाहतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशभरात आज भाजपचा ४४ वा स्थापना दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने देशात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्थापना दिवसाचे औचित्य साधून राज्यात देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. याच निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदीजींच्या नेतृत्वात जगातील पाचवी अर्थव्यवस्था होण्याचा मान भारताला मिळालेला आहे. भारत हा भविष्यातील आशेचा किरण ठरत आहे. आपण सत्तेकरिता जन्माला आलेलो नाही, सत्ता आपल्याकरिता एक साधन आहे. त्यायोगे आपल्याला सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणायचे आहे. या दोन्ही गोष्टींच्या लढाईतील उपकरण म्हणून आपण सत्तेकडे पाहतो, असे यावेळी फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात गरिबांसाठी १० लाख घरे बांधण्याचे आणि शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सामान्य माणसाला ५ लाखापर्यंत आरोग्य सेवा देण्याचे सरकारकडून ठरविण्यात आले आहे. सत्तेत असल्यामुळेच आपण समाजाच्या कल्याणाचे जनहिताचे काम करू शकलो. असे फडणवीस म्हणाले.
आज भारतीय जनता पक्ष देशाच्या सगळ्या भागामध्ये जनतेचा पक्ष म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. यामागचे कारम असे की, एक नेता स्वतःचा विचार न करता घर, संसार आणि कुटुंब सोडून २४ तास भारताचा विचार करत असल्याने त्यांच्याबाबत हा विश्वास निर्माण झाला आहे. कोविड काळात मोदी यांच्यामुळे भारतातील एकही व्यक्ती उपाशी राहिला नाही. कोरोना काळात लोकांना मोफत व्हॅक्सिन देण्याचे काम मोदी यांनी केले, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये समाजहिताचे काम करण्याचा मूलमंत्र देत स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या.