महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात सरकारला जाब विचारू : नाना पटोले

Santosh Gaikwad July 08, 2023 05:43 PM


मुंबई, दि. ७ जुलै : अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी संकटात आहे, सरकारने मदत जाहीर केली पण ती अजूनही मिळालेली नाही. सोयाबीन, कांदा, केळी पिकाला भाव नाही तर कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडूनच आहे. जून महिना संपला तरी अजून पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे येत्या १७ जूलैपासून होणा-या पावसाळी अधिवेशात यावर चर्चा झाली पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. अधिवेशनात पहिल्या दिवशीच महागाई, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारू असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 


टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,   राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत आहेत, हा काही योगायोग नाही तर दिल्लीतून मोदी-शहांनी दिलेली स्क्रिप्टच आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही लोक गेले असले तरी काँग्रेस सोडून कोणीही जाणार नाही, काही लोक जाणिवपूर्वक अफवा पसरवत आहेत. गद्दारांना सर्वजण गद्दारच दिसत असतात मात्र काँग्रेसमध्ये कोणी गद्दार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.


सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष फोडत आहे. भाजपाला विरोधी पक्षच नको आहेत म्हणून विरोधी पक्षात फुट पाडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपाचे हे फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला आवडलेले नाही म्हणूनच फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना नेहमीच महत्वाची पदे दिली, संघटनेत महत्वाची जबाबदारी दिली, दहा वर्षे केंद्रीय मंत्रिपद दिले, लोकसभेला पराभव झाल्यानंतर राज्यसभेवर पाठवले तेच पटेल आज शरद पवार यांच्यावर आरोप करत खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत असेही पटोले म्हणाले. 

------