वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Santosh Gaikwad March 11, 2024 05:29 PM


मुंबई : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महापालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला  मुंबई किनारी रस्ता प्रकल्प  (कोस्टल रोड) च्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिणवाहिनी मार्गिकेचे उद्घाटन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले.  

याप्रसंगी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, स्थानिक लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ.अश्विनी जोशी आदी यावेळी उपस्थित होते. 

 मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाबरोबरच प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करणार : - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारे तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचे शासनाचे उद्दिष्ट साध्य करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. इंजिनिअरिंगचा चमत्कार असणारा किनारी रस्ता हा या अनुषंगाने उपयुक्त प्रकल्प असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रियदर्शनी पार्क आणि रेसकोर्सच्या उपलब्ध होणाऱ्या ३०० एकर जागेत अबालवृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून मुंबईकरांसाठी हे ऑक्सिजन पार्क ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     
शिंदे म्हणाले की, राज्य शासन सर्वसामान्यांना लाभ होणारे प्रकल्प वेगाने पूर्ण करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या किनारी रस्त्यामधील एका मार्गिकेचा आज शुभारंभ होत असून पुढील टप्पा मे महिन्यापर्यंत सुरू होईल. वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्यामध्ये सहाय्यभूत ठरणाऱ्या या प्रकल्पात सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. उपलब्ध मोकळ्या जागेत हरीत क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. मुंबईचे भूमिपूत्र असलेल्या कोळी बांधवांच्या मागणीनुसार या रस्त्यांच्या खांबांमधील अंतर २० मीटरपर्यंत वाढवून त्यांना न्याय दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


हा रस्ता पुढे टप्प्याटप्प्याने दहिसर आणि पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. गेमचेंजर ठरणारा अटल सेतू, किनारी मार्ग यांसह इतर प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबईत कोठेही एका तासात पोहोचता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिद्धीविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येईल, यासाठी महापालिकेमार्फत ०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगून मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या गृह प्रकल्पांमुळे बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाजवळ उचित ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईचा विकास हेच ध्येय – देवेंद्र फडणवीस

​ किनारी रस्ता हा मुंबईकरांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविणारा प्रकल्प ठरणार असून मुंबईचा सर्वांगीण विकास हेच शासनाचे ध्येय असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. किनारी रस्त्याला परवानगी मिळताना अनेक अडचणी आल्या, तथापि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि सीआरझेडची मर्यादा बदलू न देता आणि मोकळ्या जागेत हरीत क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेऊन त्यावर मात करण्यात आल्याचे ते म्हणाले. किनारी रस्ता पुढे वांद्रे-वर्सोवा, वर्सोवा-विरार, विरार-पालघर असा टप्प्याटप्प्याने विस्तारणार असून मुंबई महानगर क्षेत्रात कोठेही एका तासात पोहोचता यावे यासाठी रस्त्यांची एक रिंग तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकरांना लाभदायी ठरणाऱ्या किनारी रस्त्याचा एक टप्पा पूर्ण होतोच याचे समाधान असल्याचे सांगून त्यांनी यासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे आभार मानले.

 
 अतिरिक्त आयुक्त​ अश्विनी भिडे यांनी प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले की, मुंबईला वेगवान करणारा हा प्रकल्प आहे. सुमारे १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या . कि.मी. लांबीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका असतील, तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. उर्वरित काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने वरळी ते मरीन ड्राईव्ह या मार्गिकेवर सध्या सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला ‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण)’ असे नाव देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.