मुंबई, दि. २० : खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण ’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती घटनेच्या तपासाअंती एका महिन्यात अहवाल सादर करणार आहे. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. सुरुवातीला उष्माघाताने १४ अनुयायांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यानंतर समाजमाध्यमातून वेगवेगळी माहिती उघडकीस येत आहे. या सोहळ्यात चेंगराचेंगरी झाली व त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. अनुयायी सात तास पाण्याशिवाय व खाण्याशिवाय उन्हात होते. गर्दीचे नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोचण्यास विलंब झाला अशा अनेक चर्चा सुरू आहेत. तसेच विरोधकांकडूनही सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली असून राज्य सरकारजर दोषी धरण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात आले आहेत. त्यामुळे अखेर राज्य शासनाकडून एक सदस्यी समिती नेमण्यात आली आहे.