आंबेकर स्मृती शालेय कॅरम: पार्ले टिळक विद्यालय अजिंक्य

Santosh Sakpal December 13, 2023 06:31 AM

  

मुंबई: कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती चषक आंतर शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद पार्ले टिळक विद्यालय कॅरम संघाने पटकाविले. मंदार पालकर, अमेय जंगम, सार्थक केरकर यांच्या विजयी खेळामुळे पार्ले टिळक विद्यालयाने कुर्ल्याच्या सेस मायकल हायस्कूलचा ३-० असा पराभव केला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे बालकदिनापासून ३२ शाळांच्या सहभागाने झालेल्या विनाशुल्क सुपर लीग शालेय कॅरम स्पर्धेचे अंतिम उपविजेतेपद सेस मायकल हायस्कूल-कुर्ला संघाने, तृतीय पुरस्कार समता विद्या मंदिर-साकीनाका संघाने व चतुर्थ पुरस्कार युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसर संघाने पटकाविला. विजेत्या-उपविजेत्यांचा गौरव माजी क्रीडापटू गोविंदराव मोहिते, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅरमपटू सुहास कांबळी, क्रीडाप्रेमी बजरंग चव्हाण, नितीन कुमार जैन, अविनाश नलावडे, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, स्पर्धा संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी केला.


   परेल येथील शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पार्ले टिळक विद्यालयाच्या तिन्ही खेळाडूंनी सरळ जाणाऱ्या सोंगट्यांना पॉकेटची सहज दिशा देत मायकल हायस्कूलचे आव्हान ३-० असे निर्विवादपणे संपुष्टात आणले. पार्ले टिळक विद्यालयाच्या मंदार पालकरने गंधर्व नारायणकरला १७-५ असे, अमेय जंगमने निखील भोसलेला ८-१ असे आणि सार्थक केरकरने शुभम परमारला १२-० असे नमविले. उपांत्य फेरीच्या सामन्यात पार्ले टिळक विद्यालयाने समता विद्यामंदिरचा ३-० असा तर सेस मायकल हायस्कूलने युनिव्हर्सल हायस्कूलचा २-१ असा पराभव केला. स्पर्धेमधील उत्तेजनार्थ पुरस्कार सीताराम प्रकाश हायस्कूल-वडाळा, सर एली कदुरी हायस्कूल-माझगाव, नारायण गुरु विद्यालय-चेंबूर, ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा संघांनी मिळविला. विश्वचषक कॅरमचे सुवर्णपदक पटकाविणाऱ्या तत्कालीन भारतीय कॅरम संघाचे प्रशिक्षक सुहास कांबळी यांनी खेळाचे तंत्र व कौशल्य विषयक चॅम्पियन कॅरम बोर्डवर सहभागी शालेय खेळाडूंना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून दाखविले. नामांकित ज्येष्ठ कॅरम पंच प्रणेश पवार व संयोजक लीलाधर चव्हाण यांनी कॅरम खेळाच्या नियमांची माहिती दिली. शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आरएमएमएसचे अध्यक्ष व आमदार सचिनभाऊ अहिर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. डीडी सह्याद्री चनेलवर क्रीडांगण सदरात स्पर्धेचे प्रक्षेपण १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वा. दाखविण्यात येणार आहे.


******************************