अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते कॅरम स्पर्धेत राज्यातील ४८ खेळाडूंमध्ये आजपासून चुरस

Santosh Sakpal June 06, 2024 07:15 AM


Mumbai/shivner 

   आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित अमृत महोत्सवी गोविंदराव माहिते चषक १९ वर्षाखालील मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधूदुर्ग आदी जिल्ह्यातील ४८ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस होईल. ही स्पर्धा ६ जूनपासून परेल येथील आरएमएमएस सभागृहात रंगणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शुभेच्छा दिलेल्या कुर्ला येथील शालेय-कॉलेज सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रणय मर्ढेकरने प्रथम, प्रतिक डावरेने द्वितीय, श्रेया जगतापने तृतीय आणि बैठका स्पर्धेत पियुष बावदाणेने प्रथम, ऋषभ थोरातने द्वितीय, वेदांत महाडिकने तृतीय क्रमांक पटकाविला.


    गुरुवारपासून सुरु होणाऱ्या शालेय-कॉलेज मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत राष्ट्रीय दर्जाचे ज्युनियर कॅरमपटू पोद्दार कॉलेजची रुची माचीवले, मराठा हायस्कूलची सिमरन शिंदे, डीपीवायए हायस्कूलचा कौस्तुभ जागुष्टे, एल.एन कॉलेजचा मिहीर शेख तसेच डॉ. आंबेडकर स्कूलचा समीर खान, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, सिध्दार्थ कॉलेजचा पृथ्वी बडेकर, डॉ. दासिल्व्हा हायस्कूलचा धुव भालेराव आदी नामवंत खेळाडू पूर्ण तयारीनिशी खेळणार आहेत. परिणामी क्रीडापटू गोविंदराव मोहिते अमृत महोत्सवी चषक पटकाविण्यासाठी कॅरमच्या दर्जेदार लढती परेलकराना पाहण्यास मिळतील. विजेत्या-उपविजेत्यांना स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.


******************************