सुरेश आचरेकर स्मृती चषकाची अनाहिता महाजन मानकरी

Santosh Sakpal August 15, 2024 12:45 AM

MUMBAI - SHIVNER


    आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित बीओबी कप विविध ८ वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धेमध्ये अनाहिता महाजनने ६ वर्षाखालील गटात सर्व सामने जिंकले आणि समाजरत्न स्व. सुरेश आचरेकर स्मृती चषक पटकाविला. बँक ऑफ बडोदा, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्यीत ६ ते १४ वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धेमधील सर्व साखळी ५ सामने जिंकणाऱ्या सर्वात लहान सबज्युनियर बुध्दिबळपटूचा विशेष पुरस्कार अनाहिताने जिंकला. तिला क्रीडा संघटक नामदेव घाग, क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

    बीओबी कप बुध्दिबळ स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील १५८ शालेय खेळाडूंनी परेल येथील आरएमएमएस सभागृहात रंगतदार लढती दिल्या. ६ वर्षाखालील गटात आक्रमक खेळ करीत सामने झटपट जिंकण्याचे बहुतांश खेळाडूंनी डावपेच रचले. अनाहिता महाजनने रीयांश कलानी, कियान पाटकर, वियोना जैन व अबीर अगरवाल यांच्या विरुध्द जलद विजय मिळविले. निर्णायक पाचव्या फेरीत मात्र अपराजित इवान दुबे विरुध्द खेळतांना अनाहीताला सावध खेळ करावा लागला. अखेर १९ व्या मिनिटाला इवान दुबेला शह देत अनाहिता महाजनने बाजी मारली आणि पाचही सामने जिंकून सुरेश आचरेकर स्मृती चषक पटकाविला.