मुंबई: शिवनेरी
कबड्डी दिनानिमित्त झालेल्या आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर शालेय विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धेत ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा संघाने अजिंक्यपद पटकाविले. आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्यीत स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर विद्यालयाने दादरच्या ताराबाई मोडक हायस्कूलचे आव्हान सुवर्ण चढाईपर्यंत रंगलेल्या निर्णायक सामन्यामध्ये १३-११ अशा गुणांनी संपुष्टात आणले. विजेत्या-उपविजेत्यांना रोझरी हायस्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर विजया चलील व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
अंतिम फेरीचा सामना डॉकयार्ड येथील रोझरी हायस्कूल सभागृहामधील मॅटवर विलक्षण चुरशीचा झाला. मोडक हायस्कूलच्या दर्शन तोंडळेकर, अनिश पोळेकर, आर्यन दिवे यांच्या आक्रमक चढायांना ज्ञानेश्वर विद्यालयाच्या उत्कर्ष बदबे, शैलेश बावडेकर, अनुराग जुवाटकर यांनी जशास तसे चाफेर चढायांनी उत्तर देत ११-११ अशी बरोबरी साधली. सुवर्ण चढाईत उत्कर्ष बदबेने टायब्रेकरचा भेद करतांना बोनस गुणासह मोडक हायस्कूलचा कोपरारक्षक टिपला. परिणामी ज्ञानेश्वर विद्यालयाने १३-११ अशा गुणांनी विजेतेपदाच्या कबड्डीप्रेमी आत्माराम मोरे चषकाला गवसणी घातली.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात ताराबाई मोडक हायस्कूलने घाटकोपरच्या ऑल इंडिया एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचा १०-८ असा तर ज्ञानेश्वर विद्यालयाने घाटकोपरच्या समता विद्यामंदिरचा ८-५ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. स्पर्धेमध्ये अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा, रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड, सेंट जोसेफ हायस्कूल-डोंगरी व सेंट मेरी हायस्कूल-माझगाव संघांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळविले. याप्रसंगी शालेय मुलींचा प्रदर्शनीय कबड्डी सामना देखील खेळविण्यात आला. शालेय कबड्डी चळवळीत कार्यरत असलेले युवा कार्यकर्ते प्रॉमिस सैतवडेकर, सुनील खोपकर, राम गुडमे, चंद्रकांत करंगुटकर, प्रितम पाटील, यश पालकर, वृषभ गायकवाड, प्रल्हाद किर्जत यांचा विशेष गौरव करण्यात आला. स्पर्धेला कबड्डीप्रेमी अश्विनीकुमार मोरे व गोविंदराव मोहिते यांचे सहकार्य लाभले होते.
******************************