मुंबई: शिवनेर
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद समता विद्यामंदिर-असल्फा शाळेने पटकाविले. एकूण शतकी १२० गुणांच्या धडाकेबाज खेळाने रंगलेल्या अंतिम फेरीत समता विद्यामंदिरने माणेकलाल मेहता मुंबई पब्लिक स्कूल संघाचा ४ गुणांनी पराभव केला आणि अजिंक्यपदाच्या आत्माराम मोरे स्मृती चषकाला गवसणी घातली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे सरचिटणीस विराज मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, अशोक बोभाटे, नवनाथ दांडेकर, प्रशिक्षक एकनाथ सणस, सुनील खोपकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
आत्माराम मोरे स्मृती शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत माणेकलाल स्कूलने चढाईपटू कुलदीप सिंग व बचावपटू शाइद पटेल यांच्या दमदार खेळामुळे पहिल्या डावात समता शाळेविरुध्द ३९-२७ अशी मोठी आघाडी घेतली. परंतु उत्तरार्धात अष्टपैलू वेद सावंत, करण इंगवले व हर्ष पावसकर यांनी आक्रमक चढाया करून भराभर गुण घेतले आणि अखेर समता विद्यामंदिरला ६२-५८ असा विजय मिळवून दिला. परिणामी माणेकलाल स्कूलला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेमध्ये वेद सावंतने सर्वोत्तम कबड्डीपटूचा, कुलदीप सिंगने उत्कृष्ट चढाईचा तर शाइद पटेलने उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार पटकाविला.
आत्माराम मोरे स्मृती स्पर्धेमध्ये दादरच्या ताराबाई मोडक हायस्कूलने तृतीय, भायखळ्याच्या अँटोनियो डिसोझा हायस्कूलने चतुर्थ आणि अफॅक हायस्कूल-चेंबूर, मुक्तांगण हायस्कूल-करी रोड, चुनाभट्टी एमपीएस, अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादर संघांनी उत्तेजनार्थ चषक मिळविला. शालेय कबड्डी खेळाडूंना विनाशुल्क मार्गदर्शनासह तंत्रशुध्द सराव, वॉर्म अप, नियमांची माहिती व स्पर्धात्मक खेळातील चुकांचे परिमार्जन, निवडक संघांना टी शर्ट व सहभागी संघांना अल्पोपहार असा मोफत उपक्रम राबविल्याबद्दल शालेय शिक्षकांनी आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
************************************************