MUMBAI : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या बँक ऑफ बडोदा-बीओबी कप बुध्दिबळ स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटू अर्जुन सिंगने ९ वर्षाखालील गटात सर्वाधिक ४.५ गुण तर १० वर्षाखालील गटात सर्वाधिक ५ गुणांसह बाजी मारून दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग पुरस्कृत स्पर्धेत अपराजित अर्जुन सिंगने एकूण सहा हजार रुपये व दोन बीओबी कपची कमाई केली. १० वर्षाखालील निर्णायक फेरीतील पहिल्या पटावरील ९ वर्षीय अर्जुन सिंगचे डावपेच पाहून बँक ऑफ बडोदाचे मुंबई विभागीय असिस्टंट जनरल मॅनेजर घन श्याम दास, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी व संयोजक लीलाधर चव्हाण यांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले होते.
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह परेल येथे रंगलेल्या बीओबी कप बुध्दिबळ स्पर्धेमधील ९ वर्षाखालील गटात अर्जुन सिंगने (४.५ गुण) प्रथम, अद्वैत मयेकरने (४ गुण) द्वितीय, अक्षज पौडेलने (४ गुण) तृतीय, दर्श राऊतने (४ गुण) चौथा, जीयांश गालाने (३.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये जीयाना गाडाने ( २ गुण) प्रथम, आराध्या पुरोने (१.५ गुण) द्वितीय क्रमांक पटकाविला. ११ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटू हृदय मणियारने (४.५ गुण) प्रथम, अर्जुन भंडारीने (४ गुण) द्वितीय, सोहम चिखलकरने (४ गुण) तृतीय, यश टंडनने (३.५ गुण) चौथा, अमोघ आंब्रेने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आद्या पाटीलने (२ गुण) प्रथम, हुसैना सलीमने (२ गुण) द्वितीय पुरस्कार जिंकला. १५ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटू प्रथमेश गावडेने (५ गुण) प्रथम, कर्णव रस्तोगीने (४ गुण) द्वितीय, मिहीर भगवाणेने ( ३ गुण) तृतीय, देबादित्य देबने (३ गुण) चौथा, श्रेयांश सोमैयाने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आर्या गोरडेने (३ गुण) प्रथम, अनिशा शेखने (१.५ गुण) द्वितीय क्रमांक मिळविला.