MUMBAI : आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे सुरु झालेल्या ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने अंतिम फेरीत प्रवेश केला. कप्तान प्रदीप क्षीरसागर, मनोज कांबळे व प्रफुल मारू यांच्या आक्रमक खेळामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने जे.जे. हॉस्पिटलचा ३ विकेटने पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. निम्मा संघ ४१ धावांत गुंडाळून सामन्यावर वर्चस्व राखणाऱ्या जे.जे. हॉस्पिटलला अखेर पराभवास सामोरे जावे लागले. फिरकी गोलंदाज प्रफुल मारूने सामनावीर व अष्टपैलू रोहित सोळंकीने उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार एमआयजीचे सेक्रेटरी भास्कर शेट्टी, क्रिकेटप्रेमी जयसुख झवेरी, राजेश शाह, अशोक चंद्रावत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया सहकार्यीत स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून जे.जे. हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर जगदीश वाघेला (३७ चेंडूत २६ धावा), प्रकाश सोळंकी (१७ चेंडूत २० धावा), अमोल दरेकर (१७ चेंडूत २१ धावा), रोहित सोळंकी (१२ चेंडूत नाबाद १० धावा) यांच्या फलंदाजीमुळे जे.जे. हॉस्पिटलने १९.४ षटकात सर्वबाद १०८ धावांचा टप्पा गाठला. फिरकी गोलंदाज प्रफुल मारू (२३ धावांत ४ बळी) व मध्यमगती गोलंदाज शंतनू मोरे (१२ धावांत २ बळी) यांनी प्रतिस्पर्ध्यांची फलंदाजी नियंत्रणात ठेवली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना मध्यमगती गोलंदाज रोहित सोळंकी (२४ धावांत ३ बळी) व फिरकी गोलंदाज जगदीश वाघेला (२६ धावांत २ बळी) यांनी अचूक गोलंदाजी करीत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलला आठव्या षटकात ५ बाद ४१ धावा असे हादरविले. परंतु मनोज कांबळे (२९ चेंडूत ४३ धावा) व कप्तान प्रदीप क्षीरसागर (१७ चेंडूत २० धावा) यांनी डाव सावरला. परिणामी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने १७.४ षटकात ७ बाद ११० धावा फटकावीत विजयाला गवसणी घातली.