समीर वानखेडेंवर सीबीआयचा छापा ! आर्यन खान प्रकरण भोवणार ?

Santosh Gaikwad May 12, 2023 09:18 PM


मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे यांच्या मुंबई येथील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. त्यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. 


 मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या टीमने २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई बंदराजवळ एका क्रूजवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यावेळी  आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. आर्यन खान तीन आठवडे तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. कार्डिंक क्रूझ ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला असून, ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वानखेडे यांच्या गोरेगाव पश्चिमेकडील इम्पेरियल हाइट्स या इमारतीच्या सी विंग मधील घरी सीबीआयची टीमकडून छापेमारी करण्यात आली. वानखेडे यांच्यासोबत एनसीबीच्या आणखी दोन अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह इतर आरोपींच्या 29 ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे.


आर्यन खानचं क्रूझ ड्रग्स प्रकरण, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावायाचं प्रकरण आणि आणखी असे काही प्रकरणं होती. त्या प्रकरणांप्रकरणी टीमकडून चौकशी करण्यात आली. या टीमने समीर वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.