मुंबई : आयडियल ग्रुप व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे २ जुलै रोजी होणाऱ्या क्रीडाप्रेमी मंगेश दिनकर चिंदरकर-एमडीसी चषक १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह १०४ खेळाडू झुंजणार आहेत. त्यामध्ये ९ वर्षाखालील राज्य विजेती त्वेशा जैन, मयांका राणा, देविका पिंगे, लक्ष्य पिल्ले, आराध्य योगेश पार्टे, नरोत्तम आशिष गर्ग, मोहमद कुरेशी आदी सबज्युनियर बुध्दिबळपटूचा कस लागणार आहे. परेल येथील आरएमएमएस सभागृहात ही स्पर्धा ७/८/१०/११/१३/१४ वर्षाखालील ६ वयोगटात रंगणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ९० पुरस्कार दिले जाणार आहेत.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने क्रीडाप्रेमी मंगेश चिंदरकर यांच्या एकसष्ठीनिमित्त स्पर्धेचे आयोजन होत आहे. स्विस लीग पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेतील प्रत्येक साखळी फेरी १५-१५ मिनिटे वेळेच्या मर्यादेत होईल. किमान चार साखळी सामने खेळविण्यात येणार आहेत. घड्याळ, पट आदी बुध्दिबळ साहित्यांची व्यवस्था संयोजकांमार्फत होईल. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, गौरवमूर्ती मंगेश चिंदरकर, मुंबई बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
******************************