अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक क्रिकेट, बुध्दिबळ स्पर्धा २३ मेपासून
Santosh Sakpal
May 17, 2023 12:06 AM
MUMBAI : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे आरएमएमएस सहकार्याने क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक क्रिकेट व बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानात २३ मे ते १ जून दरम्यान आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा रंगणार असून विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह वैयक्तिक पुरस्कार दिले जाणार आहेत. या स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन अष्टपैलू क्रिकेटपटू सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डॉ. हर्षद जाधव, केडीए हॉस्पिटलचे संदीप देशमुख व कस्तुरबा हॉस्पिटलचे डॉ. परमेश्वर मुंडे यांचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी दिली.
शालेय ७/८/१०/११/१३/१४ वर्षाखालील विविध ६ वयोगटातील मुलामुलींची अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक बुध्दिबळ स्पर्धा २८ मे रोजी परेल येथील वातानुकुलीन मामासाहेब फाळके सभागृहात होणार आहे. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेत एकूण ९० पुरस्कार दिले जाणार आहेत. विविध ६ वयोगटामधील प्रत्येक गटातील पहिल्या १० मुलांना व ५ मुलींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्विस लीग पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेतील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे वेळेच्या मर्यादेत होईल. घड्याळ, पट आदी सर्व बुध्दिबळ साहित्यांची व्यवस्था संयोजकांमार्फत होईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी स्पर्धा समितीचे सहसचिव चंद्रकांत करंगुटकर किंवा मुंबई बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (९३२४७ १९२९९) यांच्याकडे १८ मेपर्यंत संपर्क साधावा.